Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License. .: गजानन विजय ग्रंथ : अध्याय 3

गजानन विजय ग्रंथ : अध्याय 3


श्रीगणेशाय नमः जय जय सच्चिदानंदा श्रीहरी कृपा करावी लौकरी तुम्ही पदनताच्या वरी कधीं कठोर झालांत ॥१॥ तूं करुणेचा सागर तूं दीन जनाचें माहेर तूं भक्तासी साचार कल्पतरु वा चिंतामणी ॥२॥ ऐसा तुझा अगाध महिमा संत गाती राघवा रामा दासगणूसी पुरुषोत्तमा पावा वेळ करुं नका ॥३॥ असो बंकटलाला घरीं राहाते झाले साक्षात्कारी दीन दुबळ्यांचे कैवारी श्रीगजानन महाराज ॥४॥ लांबलांबोनी भक्त येती समर्थांतें वंदिती मधु तेथें माशा जमती लगे करणें आमंत्रण ॥५॥ एके दिनी काय झालें तें आतां सांगतों वहिलें महाराज होते बसलेले निजासनीं आनंदांत ॥६॥ ती प्रभातीची होती वेळा प्राची प्रांत ताम्र झाला पक्षी किलकिलाटाला करुं लागले वृक्षावर ॥७॥ कुक्कुटाचे होती स्वप्न मंदशीत वाहे पवन वृद्ध करिती नामस्मरण शय्येवरी बैसोनिया ॥८॥ उदयाचलीं नारायण येऊं पाहे हर्षें करुन तेणें तम पलायन करुं लागला कंदरीसी ॥९॥ परम भाविक सुवासिनी रत सडासंमार्जनीं वत्स धेनूस पाहोनी तोडूं लागलीं चर्हाटें ॥१०॥ ऐशा त्या रम्य वेळेस एक साधु शेगांवास येतां झाला दर्शनास श्रीगजानन साधूच्या ॥११॥ तो भिकार गोसावी मानमान्यता त्याची राहावी कोठोनिया सांगा बरवी श्रीमंताच्या मंडळींत ? ॥१२॥ भगवी चिंधी डोक्यास झोळी वाम बगलेस होती एक नेसण्यास फाटकीसी लंगोटी ॥१३॥ मृगाजिनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला ऐसा गोसावी बैसला कोपर्यांत एकीकडे ॥१४॥ दर्शनासी भीड फार होवो लागली साचार अशा स्थितींत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास ? ॥१५॥ तों ठायींच बैसोन करुं लागला चिंतन म्हणे समर्थाचे चरण दृष्टि पडणें कठीण मला ॥१६॥ समर्थांचा लौकिक भला मी काशींत ऐकला आवडीनें नवस केला भांग स्वामीस अर्पिण्याचा ॥१७॥ तो मम हेतु मनांत जिरुन जाया पाहे येथ या श्रीमान मंडळींत माझ्या नवसास कोण पुसे ? ॥१८॥ गांजाचें नांव काढितां लोक मजला देतील लाथा मी तो आलों फेडण्याकरितां नवस गांजाचा शेगांवीं ॥१९॥ माझ्या नवसाची ती मात सांगू तरी कवणाप्रत ? येथें एकही ना दिसत प्रेमी या शांभवीचा ॥२०॥ जी वस्तु ज्या आवडे खरी तिचाच तो नवस करी आणि मानी सर्वतोपरी हीच वस्तु उत्तम ॥२१॥ ऐसे नाना विचार गोसावी करी साचार झाला होता परम आतुर दर्शन घ्याया समर्थांचें ॥२२॥ तें त्याचें मनोगत जाणते झाले समर्थ बोलते झाले इतरांप्रत आणा काशीचा गोसावी ॥२३॥ तो पहा त्या कोपर्याला आहे बिचारा दडून बसला हें ऐकतां आनंद झाला गोसाव्यास परमावधी ॥२४॥ आणि बोलला मनांत त्रिकालज्ञ हे खरेच संत मी जें बोललों मनांत तें सर्व यांनीं जाणलें ॥२५॥ ज्ञानेश्वरींत षष्ठाध्यायीं जी गोष्ट कथिली पाही कीं स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा ॥२६॥ त्याचें आलें प्रत्यंतर मला येथें साचार धन्य धन्य हा साधुवर त्रिकालज्ञ महात्मा ॥२७॥ बोलतां माझा नवस जाणतील हे पुण्य पुरुष त्याचें प्रत्यंतर यावयास अवधी उरला थोडका ॥२८॥ मंडळींनीं गोसाव्याला पुढें आणोन उभा केला तों महाराज वदले तयाला काढ झोळीची पोटळी ॥२९॥ जी तीन महिनेपर्यंत रक्षण केलीस झोळींत त्या पोटळीचें आज येथ होवो दे गा पारणें ॥३०॥ गोसावी पदीं लागला गहिंवर त्यासी दाटला गडबडा लोळूं लागला बालकापरी स्वामीपुढें ॥३१॥ महाराज म्हणती गोसाव्यास पुरे आतां उठोन बैस पोटोळीच्या बुटीस काढ बाहेर झोळीच्या ॥३२॥ नवस केलास ते वेळीं नाहीं लाज वाटली आणि आतां कां ही लाविली चाळवाचाळवी निरर्थक ॥३३॥ गोसावी होता महा धूर्त तो बोलला भीत भीत जोडुनीया दोन्ही हात ऐसें नम्र वाणीनें ॥३४॥ मी बुटी काढितों नवस आपुला फेडितों परि मागणें मागतों एक तें द्या दीनाला ॥३५॥ आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणा साची हीच इच्छा मानसींची आहे ती पूर्ण करा ॥३६॥ तुम्हां बुटीचें प्रयोजन नाहीं हें मी जाणतों पूर्ण परी बालकाची आठवण राहाया बुटी स्वीकारा ॥३७॥ भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवीत अंजनीचा वृत्तान्त आणा मनीं आपुल्या ॥३८॥ अंजनी होती वानरी तिनें प्रार्थिला त्रिपुरारी कीं तुम्हीं यावें माझ्या उदरीं वानर होऊन शंकरा ! ॥३९॥ तें हरानें मानिलें महारुद्र पोटीं आले अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनीं ॥४०॥ तेथें शंकराकारण आड ना आलें वानरपण तेवीं माझ्या बुटीची आठवण राहाया तीतें स्वीकारा ॥४१॥ त्यांतून तुम्ही कर्पूरगौर साक्षात् आहां शंकर म्हणून बुटीचा अव्हेर करुं नको दयाळा ! ॥४२॥ ज्ञानवल्ली शंकरानें म्हटलें आहे इजकारणें ही इतरा आणील उणें परि भूषण तुम्हांला ॥४३॥ महाराज किंचित्घोटाळले परि अखेर होय म्हणाले माय पुरवी बालक-लळे वेडेवांकुडे असले जरी ॥४४॥ गोसाव्यानें बुटी काढिली हातावरी घेवोन धुतली चिलमींत घालून पाजिली पुण्यपुरुष गजानना ॥४५॥ ऐसा बुटीचा वृत्तान्त काथलीसे कारणासहित तो आणून ध्यानांत विचार करणें प्रत्येकीं ॥४६॥ कांहीं दिवस राहोन गेला गोसावी निघोन आपणां धन्य मानोन रामेश्वराकारणें ॥४७॥ ऐसी गांजाची पडली प्रथा ते ठायीं तत्त्वतां परी व्यसनाधीनता नच आली समर्थांतें ॥४८॥ पद्मपत्राचियेपरी ते अलिप्त होते निर्धारी नये कोणास त्याची सरी खरेंच अती थोर ते ॥४९॥ वेदऋचा अस्खलित उदात्त-अनुदात्त स्वरांसहित कधीं म्हणाव्या मुखीं सत्य कधीं त्यांचें नांव नसे ॥५०॥ वेदाक्षरें पडतां श्रवणीं साशंक व्हावें वैदिकांनीं याच एका अनुमानीं गजानन होते ब्राह्मण ॥५१॥ कधीं गवयासमान अन्य अन्य रागांतून एकच पदातें गाऊन दाखवावें निजलीलें ॥५२॥ चंदन चावल बेलकी पतीया प्रेम भारी या पदा ठाया ते आनंदांत येवोनिया वरच्यावरी म्हणावें ॥५३॥ कधीं गणगणाचें भजन कधीं धरावें नुसतें मौन कधीं राहावें पडून शय्येवरी निचेष्टित ॥५४॥ कधीं वागावें पिशापरी कधीं भटकावें कांतारीं कधीं शिरावें जाऊन घरीं एखाद्याच्या अवचीत ॥५५॥ असो त्या शेगांवांत जानराव देशमुख विख्यात होता त्याचा प्राणान्त व्हावयाचा समय आला ॥५६॥ व्याधी शरीरीं वळावली शक्ति पार निघून गेली प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनीं ती आपुल्या ॥५७॥ नाडी पाहोन अखेर आप्ता कळविला समाचार प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वांचण्याची ॥५८॥ आम्हीं प्रयत् केले अती परी यश ना आलें तिळरती यांना आतां घोंगडयावरती काढोन ठेवा हेंच बरें ॥५९॥ तें ऐकतां अवघे आप्त दुःख करती अत्यंत जानरावा आम्हां प्रत सोडून तूं जाऊं नको ॥६०॥ तुझ्याप्रीत्यर्थ नवस केले नाना दैवतांलागीं भले परी कोणी पावले हाय हाय रे दुर्दैवा ॥६१॥ वैद्यानें टेकिले हात प्रयत् झाले कुंठित आतां अखेरच्या यत्नाप्रत करोन पाहूं एक वेळा ॥६२॥ बंकटलालाचिये घरीं आहेत एक साक्षात्कारी यांच्या योगें शेगांव नगरी झाली प्रती पंढरपूर ॥६३॥ साधूनें आणिल्या मनांत काय एक नाहीं होत सच्चिदानंदबाबाप्रत ज्ञानेश्वरानें उठविलें ॥६४॥ त्याचें पाहूं प्रत्यंतर जा जा कोणी जोडा कर नका करुं रे उगा उशीर वेळ अंतसमायाची ॥६५॥ तें ऐकोनी एक आप्त आला बंकटसदनाप्रत जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली ॥६६॥ जानराव देशमुखाचा समय अंतकाळाचा आला आहे जवळी साचा म्हणून आलों तुम्हांकडे ॥६७॥ महाराजांचें चरणतीर्थ द्या कृपा करोनी मजप्रत तें तीर्थ नोहे अमृत होईल वाटे जानरावा ॥६८॥ बंकटलाल म्हणे त्यावरी ही गोष्ट माझ्या करीं तुम्ही करावी अत्यादरीं विनवणी आमुच्या वडिलाला ॥६९॥ जसें त्यानें सुचविलें तैसें आप्तें तात्काळ केलें भवानीरामा विनविलें द्याया तीर्थ समर्थांचें ॥७०॥ भवानीराम सज्जन होता मनाचा दयाळु पूर्ण दुसर्याचें दुःख ऐकून सज्जन तेच विव्हळ होती ॥७१॥ प्याल्यामध्यें भरुन पाणी समर्थांच्या लाविलें चरणीं आणि केली विनवणी तीर्थ देतो जानरावा ॥७२॥ समर्थें तुकाविली मान तीर्थ पाजिलें नेऊन जानरावाकारण घरघर घशाची बंद झाली ॥७३॥ हात हालवूं लागला किंचित् डोळा उघडीला उतार पडूं लागला तीर्थप्रभावें देशमुखासी ॥७४॥  तो पाहतां प्रकार आनंदले नारीनर सत्पुरुषाचा अधिकार आला कळून सर्वांसी ॥७५॥ मग औषधी बंद केली तीर्थीं भिस्त ठेविली ज्या-योगीं लाभती झाली आरोग्यता जानरावा ॥७६॥ आठ दिवसांमाझारीं जानराव झाला पहिल्यापरी भवानीरामाचीये घरीं आला दर्शना समर्थांच्या ॥७७॥ पहा संतांचें चरणतीर्थ साधनांत झालें अमृत संत ते साक्षात् देव कलीयुगीचे ॥७८॥ येथें एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा श्रीगजाननासारिखा संत होता शेगांवीं ॥७९॥ मग तो तेथें असतांना गेलें पाहिजे कोणी जाणा यमाजी पंताचीया सदना परि हाच आहे कुतर्क ॥८०॥ संत मृत्यु ना टाळिती निसर्गाप्रमाणें वागती परि संकटांतें वारिती अगांतुक असल्यास ते ॥८१॥ सच्चिदानंदबाबासी ज्ञानेशें उठविलें नेवाशासी परि ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो ॥८२॥ याचें रहस्य इतुकेंचि आहे हें गंडांतर टाळिती पाहे तें टाळणें कांहींच नोव्हे अशक्य संत पुरुषाला ॥८३॥ मृत्यूचे तीन प्रकार आहेत जगीं साचार त्यांचीं नांवें क्रमवार देतों तुम्हांकारणें ॥८४॥ आध्यात्मिक आधिभौतिक आणि तिसरा तो आधिदैविक त्या तिघांमाजीं बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यु असे ॥८५॥ आधिभौतिकाची तयारी कुपथ्यानें होते खरी नाना प्रकारच्या शरीरीं व्याधि निर्माण होतात ॥८६॥ त्यांचा जोर झाल्यावर मृत्यु येतो अखेर त्या मृत्यूचा परिहार करितां येतो औषधीनें ॥८७॥ मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा औषधीचा पसारा आहे अवगत जयासी ॥८८॥ एसा वैद्य भेटल्यास आधिभौतिकाचा होय नाश तैसे आधिदैविकास नवस सायास घालविती ॥८९॥ हें गंडांतर रुपाचें मृत्यु दोन प्रकारचे भौतिक आणि दैविक साचे हे आहेत ख्यात जगीं ॥९०॥ मृत्यु जो कां आध्यात्मिक तो कवणाच्यानें टळे देख। पाहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणीं ॥९१॥ तैसा जानरावाचा मृत्यु गंडांतर स्वरुपाचा होता तो टाळिला साचा समर्थतीर्थ देवोनिया ॥९२॥ म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधुचरण तेंच आलें घडोन शेगांवामाझारीं ॥९३॥ कांहीं मृत्यु नवसांनीं टाळिता येती या जनीं परी तो नवस श्रद्धेनीं केला पाहिजे विबुध हो ! ॥९४॥ श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यु टाळी खरी श्रद्धाच अवघ्या माझारीं सर्व बाजूंनीं श्रेष्ठ असे ॥९५॥ चरणतीर्थ साधूचें तेंही टाळी मृत्यु साचे वरील दोन प्रकारचे परी तो साधु पाहिजे ॥९६॥ साधू असल्या वेषधारी ऐसी होय गोष्ट खरी माती होय कस्तूरी हें ध्यानीं असूं द्या ॥९७॥ षड्विकार धुतल्याविना अंगीं साधुत्व येईना आणि साधूविण होईना अघटित कृत्य केव्हांही ॥९८॥ म्हणून बहुरुप्याकारण जपणें आहे अवश्य जाण उगीच पाहून पिवळेपण सोनें पितळेस मानूं नका ॥९९॥ गजानन नव्हते वेषधारी ते पूर्ण साक्षात्कारी म्हणून तीर्थानें झाली बरी व्याधि जानरावाची ॥१००॥ देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर साधुप्रीत्यर्थ साचार बंकटलालाचिये घरीं ॥१॥ तीर्थें देशमुख बरा झाला परी स्वामीशीं पेंच पडला त्यांनीं मनासी विचार केला तो ऐका येणेंरितीं ॥२॥ कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळेना स्वार्थसाधु प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे ॥३॥ त्या दिवसापासून आणूं लागलें अवसान स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले ॥४॥ हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना परी त्यांच्या भक्तांना कांहीं त्याचें वाटलें ॥५॥ जेवीं नरसिंह अवतार इतरांसी वाटला क्रूर परी कयाधूचा कुमार मुळीं भ्याला त्या रुपा ॥६॥ वाघीण इतरा भयंकर परी तिचें जें का असेल पोर तें तिच्याच अंगावर निर्भयपणें क्रीडा करी ॥७॥ असो आतां गोष्ट दुसरी सांगतों मी तुम्हां खरी कस्तुरीच्या शेजारीं बसल्या माती मोल पावे ॥८॥ चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा ॥९॥ वासित हिवर झालेला चंदन मानील आपणाला तरी त्याच्या फजितीला पारावार राही पुढें ॥११०॥ जेथें ऊंस निपजतो तेथेंच निवडुंग उगवतो जेथें मोगरा वाढतो तेथेंच येतो पिंगूळ ॥११॥ जेथें साधु सज्जन तेथेंच मैंद निर्माण हिरे गारा एकवटून खाणीमाजी राहाती ॥१२॥ स्थान एक म्हणून किंमत नाहीं समान तेज हिर्याचें हिर्यालागून भूषवी गारेला ॥१३॥ गार ती गारची राही पायाखालीं तुडविली जाई ऐसी स्थिति कधीं येई अमोलिक हिर्याला ॥१४॥ श्रीगजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मैंद संतसेवा हाच मद अंगीं ज्याच्या भरला असे ॥१५॥ तो सेवा करी वरी वरी भाव निराळा अंतरीं मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नांवावर ॥१६॥ भक्तगणांस ऐसे म्हणे मी समर्थकृपेचें पोसणें प्रत्येक काम माझ्याविणें होत नाहीं ये ठायां ॥१७॥  कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा कधीं खालीं जावयाचा शब्द माझा त्यांच्यापुढें ॥१८॥ चिलीम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी निजांगें मीच करी अत्यंत मी आवडीचा ॥१९॥ ऐसें लोकांस सांगतसे आपला सवरात करीतसे त्या अधमाचें नांव असें माळी विठोबा घाटोळ ॥१२०॥ महाराज स्वयमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी ॥२१॥ तें अंतर्ज्ञानांनीं जाणिलें सर्व समर्थांनीं कौतुक केलें एके दिनीं तें ऐका विबुध हो ॥२२॥ परस्थ कांहीं मंडळी शेगांवीं दर्शना आली तों मूर्ति होती निजलेली समर्थांची शय्येवर ॥२३॥ हिय्या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना मंडळीस होती जाणा त्वरा पुढें जाण्याची ॥२४॥ ते कुजबुज करुं लागले विठोबाला विनविते झाले विठोबा आम्हां पाहिजे गेलें येथून आतांच परगांवा ॥२५॥ काम निकडीचें आहे फार कैसा करावा विचार महाराज तों शय्येवर असती निद्रिस्त जाहले ॥२६॥ त्यांचें दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघेना हें अवघड काम होईना तुझ्यावांचून ये ठायीं ॥२७॥ तूं समर्थांच्या शिष्यांत मुख्य धोरणी महा धूर्त तुला आम्ही जोडितों हात एवढें काम करावें ॥२८॥ ऐशा त्या स्तुतींनीं विठोबा फुगून गेला मनीं त्यानें जाऊन तत्क्षणीं महाराजांस उठविलें ॥२९॥ मंळळींचें काम झालें परी संकट ओढवलें घाटोळ विठोबावरी भले कर्म जैसें तैसें फल ॥१३०॥ समर्थांच्या हातीं काठी एक होती भली मोठी तीच त्यांनीं घातली पाठीं त्या विठोबा माळ्याच्या ॥३१॥ म्हणती बेटा माजून गेला आपुली स्थिति विसरला या लुच्च्यानें आरंभीला उघड उघड व्यापार कीं ॥३२॥ मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मठीं घुमारे घाली कधीं कधीं ऐसा अती नीच हा ॥३३॥ त्या घुमर्याचें बक्षीस घे मी देतों तुला खास तुजवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी ॥३४॥ सोमला साखर मानूं नये विषा जवळ करुं नये तस्करासी लेखूं नये निजकंठींचा ताईत ॥३५॥ ऐशा रीतीं ठोकला छडयाखालीं घाटोळाला विठोबा तो पळाला पुनः आला मागुती ॥३६॥ खरे जे कां असती संत ते ते ऐसेंच करितात ढोंगी मात्र जातात अशाचिया करांमध्यें ॥३७॥ म्हणजे अधिकारावांचून ढोंगी बैसती होऊन संत नादीं लावण्या जन ऐसे प्रकार किती तरी ॥३८॥ मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांचा करिती भलभलते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे ॥३९॥ तेणें दोघांचें काम होई अपार पैसा मिळविला जाई परी ही प्रथा बरी नाहीं समाज जाईल रसातळा ॥१४०॥ खरे जे कां असती संत ईश्वराचे निःसीम भक्त त्यांना मुळीं आवडत सान्निध्य त्या षंढाचें ॥४१॥ पतिव्रतेसी शेजार कसबिणीचा कां पटणार ? सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे ? ॥४२॥ संत शठातें राखिती परी त्याला महत्त्व देती ती जगांतील एक व्यक्ति कृतकर्म भोगण्या आली असे ॥४३॥ ऐसें मानसीं समजून त्याविषयीं धरिती मौन जेवीं निवडुंगालागून स्थान भूमी देते हो ॥४४॥ मोगरा निवडुंग आणि शेर हीं जमीनीचीं लेंकरं परि किंमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा ॥४५॥ मोगर्याचें संरक्षण करिती निवडुंगाचें दहन चिलटांसाठीं बांधून शेर ठेविती दारावरी ॥४६॥ तेवीं संत भूमिपरी रक्षण अवघ्यांचें करिती जरी किंमतीमाजीं ठेविती परी गुणांप्रमाणें भेद पाहा ॥४७॥ नशीब विठोबा घाटोळाचें अति खडतर होतें साचें पाय लाभून साधूचें दैवें दूर झालें कीं ॥४८॥ जरी तो ना ढोंग करिता तरी योग्यतेप्रती चढता संतांची ती योग्यता त्यानें मुळीं ना जाणिली ॥४९॥ कल्पवृक्षाच्या तळवटीं बसून इच्छिली गारगोटी वा मागितली करवंती कामधेनूपासून ॥१५०॥ ऐसें कोणी करावें संतापासीं राहून बरवें तेथें विचारा ठेवावें अहर्निशीं जागृत ॥५१॥ हा दासगणूविरचित श्रीगजाननविजय ग्रंथ तारक होवो भवाब्धींत अवघ्या भाविकांकारणें ॥१५२॥ श्रीहरिहरापर्णमस्तु शुभं भवतु इति तृतीयोऽध्यायः समाप्तः

No comments:

Post a Comment