Creative Commons License
This work is licensed under a Creative Commons Attribution 4.0 International License. .: गजानन विजय ग्रंथ : अध्याय 18

गजानन विजय ग्रंथ : अध्याय 18

 श्रीगणेशा नमः जयजयाजी चिद्रिलासा हे गोविंदा श्रीनिवासा हे आनंदकंदा परेशा पाहि माम् दीनबंधो ॥१॥ हे केशवा केशीमर्दना हे माधवा मधूसुदना हे पूतनाप्राणशोषणा पांडुरंगा रुक्मिणीपते ॥२॥ काय माझ्या आहे मनीं तें तूं जाणसी चक्रपाणी तेंच का रे तुजलागुनी बोलून दावूं पद्मनाभा ॥३॥ भक्त जी जी इच्छा करी ती तूं पुरविसी श्रीहरी ऐसें पुराणाभीतरीं आहे वर्ण्न बहुसाळ ॥४॥ म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा सोडा मनींची कठोरता दासगणू हा तुझा असे ॥५॥ अकोटाचे शेजारीं मुंडगांव नामें एक नगरीं तेथें बायजा नामें खरी समर्थाची भक्तीण असे ॥६॥ हळदी माळ्याच्या वंशांत इचा जन्म झाला सत्य शिवराम नामें इचा तात भुलाबाई जननी असे ॥७॥ बायजाचे बाळपणीं लग्न झालें होतें जाणी ललाटीं जें विधात्यांनीं लिहिलें असेल तेंच घडे ॥८॥ बायजा आली तारूण्यांत गर्भाधान करण्याप्रत घेऊन गेला तिचा तात जामाताच्या गृहासी ॥९॥ परी उपयोग नाहीं झाला जामात षंढ होता भला तेणें जनकजननीला शिक झाला अनावर ॥१०॥ बायजेकडे पाहून जननी करी रोदन माझ्या बाईचें तारूण्य वांझ पाहूं राहातें ॥११॥ भुली म्हणे शिवरामासी बायजा ठेवा ऐशी दुसरा नवरा करून इसी देणें आहे भाग पाहा ॥१२॥ शिवराम म्हणे त्यावर ऐसा नको सोडूं धीर हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना ॥१३॥ कांहीं दिवस वाट पाहूं नको ऐसी अधीर होऊं बायजासी येथेंच ठेवूं तिच्या सासुरवाडीला ॥१४॥ नपुसकत्व अधोपरी आलें असेल त्याला जरी तें औषधानें होईल दुरी वाट पाही यास्तव ॥१५॥ ऐसें उभयतां बोलून बायजासी तेथें ठेवून आले मुंडगांवाकारण आपुल्या घरातें ॥१६॥ बायजीचें वय पंधरासोळा वर्ण काळासावळा तारुण्यानें मुसमुसला होता जिचा शरीरभाग ॥१७॥ डोळे नाक पाणीदार बांधा उंच मनोहर जिला पाहातां अंतर कामुकाचें मोहित होई ॥१८॥ तिच्या थोरल्या दिरासी पाहूनियां बायजासी इच्छा जाहली मानसीं संभोग तिचा करावया ॥१९॥ त्यानें प्रयत्न केले नाना वळवावया तिच्या मना म्हणूं लागला क्षणक्षणा ऐसें बायजाकारणें ॥२०॥ हताश ऐशी मुळीं होई मीच तुला पतीचे ठायीं आमरण करीन पाही तुझें वेडे संगोपन ॥२१॥ झुरणें दे हें सोडून आनंदित ठेवी मन वेडे आजपासून मीच नवरा समज तुला ॥२२॥ ऐसें त्यानें सांगावें चाळे नाना करावें कांहीं आमिष दावावें चित्त तिचें भुलवाया ॥२३॥ परी उपयोग होईना बायजीच्या हें येई मना ती म्हणे हे नारायणा ! कां रे दैन्य मांडलेंस ? ॥२४॥ बाळपणापासून ध्याइले मीं तुझे चरण त्याचेंच कां हें मजलागून फल दृष्टीं पडावें ? ॥२५॥ जयाचा मीं हात धरिला तो ना पुरुष कळून आला दैवयोग समजून चुकला संसार नशिबीं नाहीं मम ॥२६॥ बरें झालें तुझ्याठायीं चित्त आतां रमेल पाही कृपा करीरे शेषशायी स्पर्श पुरुषाचा होवो मला ॥२७॥ ज्येष्ठ दीर एके दिवसीं येता झाला बायजापासीं आपला हेतु कळविण्यासी रात्रीचिया समयाला ॥२८॥ तों बायजानें इनकार करून केलें उत्तर कैसी लाज तिळभर नाहीं उरलीं चित्तीं तुझ्या ॥२९॥ तूं माझा ज्येष्ठ दीर पित्यापरीस साचार सोडा हा अविचार स्वैर ऐसा होऊं नको ॥३०॥ ह्या तियेच्या भाषणा तो ना आणी मुळीं मना होतां कामाची वासना नीति विलया जातसे ॥३१॥ अंगावरी टाकण्या हात जों तो पाही इतक्यांत तयाचा तो थोरला सुत माडीवरून पडला हो ॥३२॥ खोक पडली डोक्यासी बायजेनें धरिलें त्यासी बसवून आपुल्या मांडीसी औषध लावूं लागली हो ॥३३॥ बायजा म्हणे ज्येष्ठ दीरा या गोष्टीचा विचार करा अभिलाष तो नाहीं बरा परस्त्रियेचा केव्हांही ॥३४॥ मुलगा पडलेला पाहून भय पावलें त्याचें मन अनुताप त्यासी झाला पूर्ण केलेलिया कर्माचा ॥३५॥ त्यानें नाद सोडिला सदनीं निवांत राहिला पुढें शिवराम घेऊन गेला कन्येस आपुल्या मुंडगांवीं ॥३६॥ भुलाई म्हणे पतीसी चला जाऊं शेगावांसी महाराजातें पुसायासी पुढील भाकीत बायजेचें ॥३७॥ तें मानेलें शिवरामासी आला घेऊन कन्येसी महाराजांतें पुसायासी आपुल्या त्या कांतेसह ॥३८॥ बायजा घातली पायांवर केली विनंति जोडून कर कृपा करा या मुलीवर पुत्र पौत्र द्यावे हिला ॥३९॥ तें समर्थांनीं ऐकिलें शिवरामासी हांसत वदले अरे नशिबीं नाहीं लिहिलें विधात्यानें पुत्र हिच्या ॥४०॥ जेवढे पुरुष जगतांत तेवढे असती हिचे तात उगे पडा फंदांत लग्न हिचें करण्याच्या ॥४१॥ तें ऐकतां शिवरामाला अनावर शोक झाला घेऊन त्या बायजाला परत आला मुंडगांवीं ॥४२॥ परी त्या समर्थवचनांनी बायजा आनंदली मनीं निष्ठा गजाननाच्या चरणीं जडली तेव्हांपासून ॥४३॥ समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामें मुंडगांवांत त्याच्या संगें शेगांवांत बायजा येऊं लागली ॥४४॥ पहिल्या प्रथम अडथळा जननीजनकें नाहीं केला शेगांवांस जाण्याला पुंडलिकाचे बरोबर ॥४५॥ त्यांना ऐसें वाटलें साधुचरण इनें धरिले तेच तिच्या करतील भले निजकृपेनें कल्याणा ॥४६॥ पुरुषत्व देतील जामातासी अशक्य ना कांहीं संतांसी ऐसा विचार मानसीं करून राहिले स्वस्थ ते ॥४७॥ पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊं लागली खरी तेणें पुकार जगभरी ऐशा रीतिं जाहली ॥४८॥ हें शेगांवच्या वारीचें ढोंग आहे दोघांचें तरुणपणीं मानवाचें मन परमार्थी लागेना ॥४९॥ बायजा आहे तरणीज्वान पुंडलिकासीही तारुण्य यांची वारी विषयभान हीच आहे निःसंशय ॥५०॥ परस्परें प्रीति जडली विषयसुखाची नवाळी गण्या ही युक्ति केली वाटते या उभयतांनीं ॥५१॥ पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध योग्य होता बायजाच्या धरण्या हाता कां कीं तरुण दोघेही ॥५२॥ पुंडलिक आहे मराठी ही माळ्याच्या आली पोटीं म्हणून यांची ताटातुटी केलीच पाहिजे जातीस्तव ॥५३॥ या दोघांचें अंतर शुध्द होतें साचार नव्हता कामाचा विकार मनीं उत्पन्न जाहला ॥५४॥ भुलाई म्हणे बायजासी तूं कां कारटे अहर्निशीं पुंडालिकाच्या घरा जासी हें कांहीं कळेना ॥५५॥ ऐशा तरुण वयांत तुम्हां कशाचा परमार्थ ? कोल्हा राही उपोषित उंसाचिया फडामधीं ॥५६॥ वा पाहून बाटुकाला बैल नाहीं पुढें गेला कारटे आमुच्या नांवाला काळें उगें लावूं नको ॥५७॥ भुलाई म्हणे नवर्यासी हिला नका ठेवूं ऐसी लावून द्यावे मोहतरासी पाहा पोरगा माळ्याचा ॥५८॥ ही पुंडलिकाच्या घरीं जाते सदा त्यासी हितगुज करिते एकमेकां पाहून भरतें येत दोघां प्रेमाचें ॥५९॥ जाऊं चला शेगांवास घेऊन या कारटीस सांगूं अवघे महाराजास चाळे या बायजीचे ॥६०॥ संतासी अवघें कळतें ते सन्न्तीचे चाहाते पोटामाजीं कधीं निघते चंदनाच्या दुर्गंधी ॥६१॥ भुला-शिवराम-बायजाबाई पुंडलीक भोकर्या आला तोही चौघे येऊन लागले पाई शेगांवीं श्रीसमर्थांच्या ॥६२॥ पुंडलिकासी पाहून बोलूं लागले दयाघन कीं बायजा तुझी बहीण पूर्व जन्मींची पुंडलिका ॥६३॥ लोक निंदा जरी करिती तरी अंतर द्यावें इजप्रती दोघें मिळून करा भक्ति सच्चिदानंद हरीची ॥६४॥ भुले आपुल्या पोरीस लावूं नको भलता दोष हीं बहीण-भाऊ आहेत मुळींच पूर्वजन्मींचें ॥६५॥ शिवाय या बायजीला कोठेंहि नवरा भला ही आली करायाला संसार मुळीं जगामध्यें ॥६६॥ ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मवरी जनाबाई पंढरपुरीं अशाच रीतीं राहिली गे ॥६७॥ तिनें नामदेव गुरु केला ही शरण आली आम्हांला माझ्या जनाबाईला कोणी ना आतां छळावें ॥६८॥ ऐसें समर्थांचें भाषण शिवरामानें ऐकून गेला असे गहिंवरून शब्द कांही बोलवे ॥६९॥ घेऊन आपुल्या मुलीला शिवराम मुंडगांवासी आला पुढें बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे ॥७०॥ महाराज आपुल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करितात ते कसे, ही थोडक्यांत गोष्ट सांगतों ये ठाई ॥७१॥ भाऊ राजाराम कवर एक डाँक्टर पहा खामगांवावर दवाखान्याचा अधिकारी ॥७२॥ त्यास दुर्धर फोड झाला आणविला मोठ्या डाँक्टराला औषधपाणी करायाला खामगांवामाझारीं ॥७३॥ बुलढाणा अकोला उमरावती येथून डाँक्टर आणिले असती शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला ॥७४॥ नाना औषधें पोटांत दिलीं विविध पोटीसें बांधिलीं शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या फोडाला ॥७५॥ कशाचा ना उपयोग झाला फोड वाढुं लागला वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा ॥७६॥ भाऊ तळमळे शय्येवरी व्याधि असह्य झाली खरी शेवटीं त्यानें अंतरीं विचार ऐसा केला हो ॥७७॥ आतां हाच उपाय आठवावे सद्गुरुपाय याविणें दुसरी सोय कांहीं नसे राहिली ॥७८॥ पडल्या पडल्या जोडी हात म्हणे धांव धांव हे सद्गुरुनाथ या लेंकराचा वृथा अंत किमपि आतां पाहूं नका ॥७९॥ ऐशी श्रोते विनवणी करूं लागला क्षणोक्षणीं रात्र गेली उलटोनी सुमारें समय एकाचा ॥८०॥ तमानें भरलें अंबर रात्रीचा तो शब्द किर्र कोल्हे-हुकेनें कांतार दणाणून गेलें हो ॥८१॥ तो एक दमणी आली तट्ट्यावरी लागलेली गाडीस होती जुंपिली जोडी खिलार्या बैलांची ॥८२॥ कंठामाजीं घागरमाळा वाजूं लागल्या खळखळा मागें पुढें सोडिला होतां पडदा दमणीस ॥८३॥ दवाखान्याच्या दारापाशीं दमणी आली निश्चयेंसी डाँक्टर पाहात होता तिसी पडून आपल्या शय्येवर ॥८४॥ तों एक उतरला ब्राह्मण दमणीला खालीं भला दार ठोठावूं लागला डाँक्टराच्या बंगल्याचें ॥८५॥ डाँक्टराच्या बंधूंनीं दार उघडलें ते क्षणीं प्रश्न केला कोठूनी आपण आलांत ये ठायां ? ॥८६॥ ब्राह्मण बोले त्याकारण माझें गजा नामाभिधान तीर्थअंगारा घेऊन शेगांवाहून आलों मी ॥८७॥ डाँक्टर भाऊ कवराला जो का आहे फोड झाला हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी ॥८८॥ प्यावयासी दिलें तीर्थ हें घ्या आपुल्या हातांत मी जातों आतां परत वेळ मशी राहावया ॥८९॥ तीर्थअंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण त्या शोधाया कारण भाऊनें शिपाई पाठविला ॥९०॥ परी पत्ता लागला गाडी दिसली कवणाला भाऊ मनीं घोटाळला कशाचा ना तर्क चाले ॥९१॥ फोडास लावितां अंगारा तो तात्काळ फुटला खरा येऊं लागला भराभरा पूं त्या श्रोते फोडांतून ॥९२॥ एक घटका गेल्यावर पूं गेला निघून पार पाहा किती आहे जोर समर्थाच्या अंगार्याचा ? ॥९३॥ भाऊस निद्रा लागली व्याधीं पुढें बरी झाली हळूहळू शक्ति आली भाऊ झाला पूर्ववत् ॥९४॥ दर्शना गेला शेगांवास तों समर्थ वदले ऐसें त्यास माझ्या गाडीबैलास नुसता चारा दिलास तूं ५॥ हें सांकेतिक भाषण कळलें भाऊलागून हृदय आलें उचंबळून त्या भाऊ कवराचें ॥९६॥ त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन लेंकरासाठीं धांवून खामगांवास आला हो ॥९७॥ कवरें केलें अन्नदान त्या व्याधीच्या निमित्त जाण अंतर्ज्ञानी असती पूर्ण श्रीगजानन अवलिया ॥९८॥ असो एकदां समर्थस्वारी निघती झाली पंढरपुरीं त्या श्रीचंद्रभागेतीरीं विठ्ठलासी भेटावया ॥९९॥ होती मंडळी बरोबर दिवस वारीचा साचार स्पेशल गाड्या वरचेवर जाऊं लागल्या पंढरीला ॥१००॥ जगू आबा पाटील हरी बापुना मंडाळी दुसरी सोडूनिया शेगांव नगरी नागझरीला आले हो ॥१॥ त्या गांवीं माळावर आहे एक भुयार येथें गोमाजी नामें साधुवर समाधिस्त झालासे ॥२॥ झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे आहेत म्हणून गांवाचें नांव पडलें नागझरी ॥३॥ हा गोमाजी बोवा साचा गुरु महादाजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला साचा शेगांवींच्या पाटीलवंशा ॥४॥ म्हणून पाटील शेगांवचे गोमाजीला वंदून साचे रस्त्यास लागती पंढरीचे ऐसा त्यांचा परिपाठ ॥५॥ या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन अग्निरथांत बैसून निघते झाले पंढरीला ॥६॥ हरीपाटला बरोबरी समर्थाची होती स्वारी बापुना आणि दुसरीं माणसें पांचपन्नास ॥७॥ आषाढ शुध्द नवमीचा तो दिवस होता साचा समुदाय वारकर्यांचा येऊं लागला पंढरीसी ॥८॥ मेघ दाटले अंबरीं क्वचित् कोठें भूमीवरी पर्जन्याची वृष्टी खरी होऊं लागली श्रोते हो ! ॥९॥ तें भुवैकुंठ पंढरपुर गजबजून गेलें फार भरतीं येतां सागर जेवीं जाय उचंबळोनी ॥११०॥ प्रदक्षणेच्या रस्त्यावरी टाळांची ती गर्दी खरी ' जय जय रामकृष्ण हरी ' भक्त म्हणती उच्च स्वरें ॥११॥ शब्द कवणाचा कवणाला ये ऐकावयाला ऐसा आनंदी आनंद चालला तो वानूं कोठवर ॥१२॥ नाथ निवृत्ति ज्ञानेश्वर सांवता गोरा कुंभार श्रीतुकोबा देहूकर सोपान मुक्ता जनार्दन ॥१३॥ या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या देखा भक्तांनीं उधळिला बुक्का आदर करायाकारणें ॥१४॥ त्यायोगें आकाशांत बुक्क्याचें जणूं झालें छत सुवास उठला घमघमीत गर्दी तुळशीफुलांची ॥१५॥ श्रोते त्या समयाला सम आले पंढरीला उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या ॥१६॥ हा प्रदक्षणेच्या वाटेवरी वाडा चौफाळ्याशेजारीं दर्शनाला भीड खरी झाली असे राउळांत ॥१७॥ लिस हाताहातावरी उभे राहिले रस्त्यांतरीं पथें चालले वारकरी भजन करीत हरीचें ॥१८॥ एकादशीस साचार हरी पाटलाबरोबर बापुनाविना इतर गेले दर्शना हरीच्या ॥१९॥ बापुना मागें राहिला तो होता स्नानासी गेला म्हणून त्यासी वेळ झाला मंडळी गेली निघून ॥१२०॥ स्नान करून आला घरीं तों समजलें ऐशापरी दर्शनासी गेली सारी आतांच मंडळीं विठ्ठलाच्या ॥२१॥ मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून हेत राउळाच्या भोंवतीं अमित गर्दी झाली लोकांची ॥२२॥ मुंगीस वाट मिळेना तेथें हा बापुना केवीं जाईल दर्शना शिवाय गरिबी पदरांत ॥२३॥ बापुना म्हणे मानसीं हे विठ्ठला हृषीकेशी कां रे निष्ठुर झालासी ? मजला देई दर्शन ॥२४॥ तूं सांवत्या माळ्याकारण अरणीं गेलास धांवून तेवीं येई राउळांतून मज भेटाया पांडुरंगा ॥२५॥ ' अरण ' होते आठ कोस तैसें नव्हें येथें खास मी मंदिराच्या सान्निध्यास उभा आहे वाटेवरी ॥२६॥ तुला लोक म्हणतात तूं अनाथांचा असशी नाथ मग कां रे देवा मजप्रत उपेक्षिलें या वेळीं ? ॥२७॥ ऐसा बहुत धांवा केला शेवटीं बापुना हताश झाला परत बिर्हाडासी आला अस्तमानाचे समयास ॥२८॥ मुख झालें होतें म्लान अवघ्या दिवसांचें उपोषण बापुनाचें अवघें मन विठ्ठलाकडे लागलें ॥२९॥ शरीर मात्र होतें घरीं मन मंदिराच्या सभोंवरी फिरत होतें भिरीभिरी याचें नांव ध्यास हो ॥१३०॥ बापुनासी पाहून हंसूं लागले अवघेजण हा बेटा अभागी पूर्ण कळून आला आपणां ॥३१॥ शेगांवाहून दर्शना पंढरीसी आला जाणा येथें येऊन खेळ नाना फिरला पाहात गांवामध्यें ॥३२॥ याची दांभिक अवघी भक्ति यास कशाचा श्रीपती ? ऐन वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी ! ॥३३॥ कोणी म्हणाले बापुनाला वेदान्त आहे अवघा आला तो कशाशीं दर्शनाला जाईल सांगा राउळांत ॥३४॥ त्याचा भगवंत हृदयांत आहे सर्वदा खेळत वेदान्त्याचें ऐसें मत दगडामाजीं काय आहे ? ॥३५॥ आपण वेडे म्हणून घ्याया गेलों दर्शन बापुनाचा नारायण वाटेल तेथें उभा असे ॥३६॥ मग दुसरा म्हणाला मग हा येथें कशास आला ? कां शेगांवीं तयाला भेटला नसता ईश्वर ? ॥३७॥ अहो हे वेदान्ती लोकां ज्ञान सांगती शब्द चावटी हमेश करिती अनुभवाचा लेश नसे ॥३८॥ सगुणोपासना झाल्या पूर्ण मग होणार आहे ज्ञान आल्यासी लहानपण तरुणपणा येतो कसा ? ॥३९॥ ऐसा उपहास तयाचा प्रत्येकानीं केला साचा अवघ्यांपुढें एकट्याचा टिकाव लागावा कुठूनी ? ॥१४०॥ तो बापुना बसला उपोषित दातांसी लावूनी दांत ते होते अवघे पहात स्वामी निजल्या जागाहून ॥४१॥ गरीबाचें सांकडें साधूलाच एक पडे सत्संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवान ॥४२॥ समर्थ म्हणती बापुना दुःख नको करूंस मना ये तुला रुक्मिणीरमणा भेटवितों ये काळीं ॥४३॥ तों महाराज उभे राहिलें कटीं हात ठेविलें पाय खालीं जुळविलें समचरण दावावया ॥४४॥ तुळशीफुलांच्या माळा कंठीं मूर्ति सांवळी गोमटी बापुनाच्या पडली दृष्टी शीर ठेविलें पायांवर ॥४५॥ पुन्हां जो पाहे वरीं समर्थ दिसले पहिल्यापरी तेणें बापुनाच्या अंतरीं अति आनंद जाहला ॥४६॥ धोतर, पागोटें आणि शेला जो घरीं दृष्टि पडिला तोच त्यानें पाहिला दर्शना जातां राउळांत ॥४७॥ इतर म्हणाले महाराजांस तसेंच दर्शन आम्हांस होऊं द्या आम्हां आहे आस पुनरपि श्रीच्या दर्शनाची ॥४८॥ ऐसें ऐकतां भाषण बोलते झाले गजानन बापुनासारिखें आधीं मन तुम्ही करा रे आपुलें ॥४९॥ तें तसें झाल्यावरी दर्शन घडवीन निर्धारीं ही दर्शन वस्तु खरी काय मिळे बाजारांत ? ॥१५०॥ म्हणून ती आणून देऊं तुम्हांकारण निष्पाप करा आधीं मन तरीच पुढचें घडेल हें ॥५१॥   पहा समर्थांनीं बापुनाला विठ्ठल साक्षात् दाखविला कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे ॥५२॥ संत आणि भगवन्त एकरूप साक्षात गुळाच्या त्या गोडीप्रत कैसें करावें निराळें ? ॥५३॥ काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी बापुनाच्या अंतरीं दर्शन तें ठसावलें ॥५४॥ याच पुण्यें करून पुत्र झाला त्याकारण रसिक चतुर विद्वान संतसेवा जाई वृथा ॥५५॥ पंढरीच्या प्रसादानें पुत्र झाला त्याकारणें म्हणूनच नांव त्यानें ठेविलें नामदेव बालकासी ॥५६॥ कवठे बहादूर गांवाचा एक माळकरी होता साचा तो वर्हाडप्रांतीचा म्हणून उतरला वाड्यांत ॥५७॥ तेथें आषाढी द्वादशीसी मरी आली मुक्कामासी त्या पंढरपुरक्षेत्रासी मग काय विचारितां ? ॥५८॥ प्रेतामागें चाले प्रेत पोलिस शिरती घरांत यात्रा काढून देण्याप्रत डाँक्टराच्या हुकुमानें ॥५९॥ वारकर्याला ओढिती गाडीमाजीं बसविती चंद्रभागेच्या पार करिती कुर्डुवाडी रस्त्याला ॥१६०॥ हा कवठे बहादूरचा वारकरी झाला मरीनें आजारी ढाळ होती वरच्यावरी उलटी मुळींच थांबेना ॥६१॥ गोळे हातांपायांसी येऊं लागले बहुवशी कोण जाई त्याजपाशीं शुश्रुषा त्या करावया ॥६२॥ पोलिसभयानें हें वृत्त कळविलें ना कोणाप्रत शेगांवीचे समस्त लोक जाया निघाले ॥६३॥ वाडा घटकेंत मोकळा झाला हा वारकरी मात्र होता पडला कठीण काळच्या समयाला कोणी येती उपयोगी ! ॥६४॥ लोक सुखाचे सोबती संकटकालीं अव्हेरिती तेथें एक रक्षण करती संत अथवा देव हो ॥६५॥ तो पाहून प्रकार श्रीगजानन साधुवर म्हणाले हा ओसरीवर निजला यास घेऊन चला ॥६६॥ लोक म्हणती गुरुराया ! हा बहुतेक मेला सदया याच्या नादीं लागतां वायां संकट येईल आपणांतें ॥६७॥ पन्नास माणूस बरोबर आपल्या येधवां साचार मरीचा तो झाला जोर सांप्रत या पंढरीसी ॥६८॥ अशा स्थितींत ये ठाई थांबणें हें कांहीं बरें नाहीं चला जाऊं लवलाही चंद्रभागेच्या पलीकडे ॥६९॥ तों महाराज म्हणती अवघ्यांला तुम्ही कैसें खुळावला ? आपल्या देशबंधूला सोडितां हें बरें नव्हे ! ॥१७०॥ ऐसें वाटून जवल गेले वारकर्याला करा धरलें त्यासी उठून बसविलें आणि केलें मधुरोत्तर ॥७१॥ चाल बापा ऊठ आतां जाऊं आपल्या वर्हाडप्रांता वारकरी म्हणे गुरुनाथा ! आतां वर्हाड कशाचें हो ? ॥७२॥ समीप आला माझा अंत जवळ नाहीं कोणी आप्त तई म्हणाले सद्गुरुनाथ वेड्या ! ऐसा भिऊं नको ॥७३॥ तुझें टळलें गंडांतर ऐसें वदोन ठेविला कर त्या वारकर्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली ॥७४॥ वाटूं लागली थोडी शक्ति उभा राहिला त्वरित गती संतानें ज्या धरिलें हातीं त्यातें निजमनें यम नेई कसा ? ॥७५॥ घटकेंत झाला पहिल्यापरी मंडळीच्या बरोबरी चंद्रभागेच्या पैलतीरीं आला समर्थासमवेत ॥७६॥ आनंद झाला फार त्यासी वंदी समर्थचरणांसी म्हणे दयाळा काढिलें मशी दाढेंतून काळाच्या ॥७७॥ ऐसा घडतां चमत्कार भक्त करिती जयजयकार आले कुर्डुवाडीवर निर्धास्तपणें सर्वही ॥७८॥ पंढरीची करून वारी आली शेगांवाप्रती सारी मंडळी ती बरोबरी श्रीगजाननस्वामीच्या ॥७९॥ एक कर्मठ ब्राह्मण घ्याया आला दर्शन त्या शेगांवाकारण श्रीगजाननस्वामींचें ॥१८०॥ तयानें स्वामीची कीर्ति निजदेशीं ऐकिली होती म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठायां ॥८१॥ सोवळें ओंवळें त्याचें अती तो होता मध्वमती खट्टू झाला परम चित्तीं समर्थासी पाहातां ॥८२॥ व्यर्थ आलों म्हणे येथ या वेड्यासी वंदण्याप्रत हा भ्रष्टाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी ॥८३॥ सोंवळें ओंवळें येथ मेलें अनाचाराचें राज्य झालें अशा पिशाला म्हणूं लागले साधू लोक हाय हाय ॥८४॥ तो तया मठांत काळें कुत्रें झालें मृत पडलें होतें त्याचें प्रेत येण्याजाण्याच्या वाटेवरी ॥८५॥ त्या श्वानातें पाहून ब्राह्मण झाला मनीं खिन्न आणूं कसें जीवन श्वान मध्यें पडला हा ॥८६॥ याला कोणी उचलीती गांजा सदैव धुनकिती या वेड्यातें वंदिताती " महाराज, महाराज, " म्हणून ॥८७॥ जळो याचें साधुपण मला बुध्दि कोठून झाली याचें दर्शन घ्याया कांहीं कळेना ॥८८॥ त्याचा संशय फेडावया समर्थ आसन सोडोनियां येते झाले तया ठायां जेथें होता ब्राह्मण ॥८९॥ आणि म्हणाले तयाप्रत पूजा करावी यथास्थित कुत्रें झालें नाहीं मृत संशय उगा घेऊं नका ॥१९०॥ तें ऐकून रागावला निज समर्था बोलूं लागला अरे नाहीं वेड मला तुझ्यासम लागलेलें ॥९१॥ कुत्रें मरून झाला प्रहर त्याचें प्रेत रस्त्यावर पडलें याचा विचार तुम्हीं कोणी केला कीं ॥९२॥ ऐसें बोलतां विप्राला समर्थांनीं जाब दिला आम्ही भ्रष्ट आम्हांला तुमच्यासम ज्ञान नाहीं ॥९३॥ परी खंति करा तिळभर पाणी आणाया घागर घेऊन चलावें सत्वर माझ्यामागें विप्रवरा ॥९४॥ ऐसें बोलून कुत्र्यापासीं येते झाले पुण्यराशी स्पर्श पदाचा करतां त्यासी कुत्रें बसलें उठोन ! ॥९५॥ तों पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरुत्तर म्हणे याचा अधिकार थोर आहे देवापरी ॥९६॥ मी व्यर्थ निंदा केली योग्यता ना जाणली ऐसें म्हणून घातली समर्थाच्या मिठी पायां ॥९७॥ माझे अपराध गुरुवरा ! आज सारे क्षमा करा वरदहस्त ठेवा शिरा मी अनंत अपराधी ॥९८॥ तूंच सोंवळा साचार एक आहेस भूमीवर करण्या जगाचा उध्दार तुम्हां धाडिलें ईश्वरानें ॥९९॥ श्रोते त्याच दिवशीं भली समाराधना त्यानें केली कुशंका मनाची पार फिटली लीन झाला अत्यंत ॥२००॥ प्रसाद घेऊन गेला परत आपुल्या तो देशाप्रत समर्थ साक्षात् भगवंत ऐसी प्रचीति आली तय ॥१॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित हा गजाननविजय नामें ग्रंथ भाविकां लाभो सत्पथ हेंचि इच्छी दासगणू ॥२०२॥ शुभं भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु इति अष्टादशोऽध्यायः समाप्तः



No comments:

Post a Comment