॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी परशुधरा । हे जमदग्नीच्या कुमारा । परशुरामा परमेश्वरा । आतां उपेक्षा करूं नको ॥१॥ तूं सहस्त्रार्जुनातें दंडून । केलें द्विजांचें संरक्षण । ब्राह्मणांचा अपमान । सहन झाला नाहीं तुला ॥२॥ आतां मात्र डोळे मिटिसी । कां रे देवा ब्राह्मणांविशीं ? । काय आहे लागली तुसी । गाढ निद्रा येधवां ॥३॥ म्हणून डोळे मिटूं नका । स्वस्थ ऐसें बसूं नका । आणीबाणीचा प्रसंग देखा । आहे हरी सांप्रत ॥४॥ तुझ्या वशिल्यावांचून । अवघीं कृत्यें आहेत शीण । आर्यसंस्कृतीचें रक्षण । होणें नाहीं तुझ्याविण ॥५॥ गजाननमाया अघटित । कोण जाणें तिजप्रत । महाराजांचा एक भक्त । पुंडलिक नामें मूंडगांवीं ॥६॥ हा शेगांवची करी वारी । समर्थाविषयीं प्रेम भारी । हमेश त्यांचें चिंतन करी । एकाग्रशा मनानें ॥७॥ त्याच गांवीं भागाबाई । एक ठाकरीण होती पाही । निष्ठा तिची एक्याही । ठिकाणासीं बसत नसे ॥८॥ ती दांभिक होती फार । सदा दंभाचा बाजार । भरवून भोंदी नारीनर । हाच धंदा तियेचा ॥९॥ ती बोलली पुंडलिकाला । तुझा जन्म वाया गेला । कां कीं तूं नाहीं केला । सद्गुरु तो आपणांतें ॥१०॥ गजाननाच्या वार्या करिसीं । सद्गुरु त्याला मानिसी । परी त्यानें सांग तुसी । मंत्र कानीं कथिला कां ? ॥११॥ अरे विधीवांचून । गुरु न होत कधीं जाण । शेगांवचा गजानन । वेडापिसा साच असे ॥१२॥ तुझा ताप बरा झाला । म्हणून तूं मानिसी त्याला । या काकतालीयन्यायाला । बळी पुंडलिका पडूं नको ॥१३॥ ' गिन गिन गणातें ' हें भजन । पिशापरी आचरण । कोणाचेंही खाई जाण । ऐसा मुळीं भ्रष्ट तो ॥१४॥ म्हणून तुला सांगतें । चाल अंजनगांवातें । केजाजीच्या शिष्यातें । आपण दोघे गुरु करूं ॥१५॥ उद्यां त्यांचें कीर्तन । अंजनगांवीं असे जाण । तें ऐकावया कारण । उठून जाऊं प्रातःकाळीं ॥१६॥ गुरु असावा महाज्ञानी । चातुर्य-शास्त्र-चिंतामणी । गुरु असावा परमगुणी । भक्तिपथातें दावितां ॥१७॥ यांतील लक्षण एकही । गजाननाच्या नसे ठायीं । म्हणून वेळ न करी कांहीं । चाल अंजनगांवांतें ॥१८॥ तो भोकरे पुंडलिक । होता मनाचा भाविक । भागीच्या भाषणें देख । चित्त त्याचें घोटाळलें ॥१९॥ त्यानें ऐसा विचार केला । उदईक अंजनगांवाला । जाऊं कीर्तन ऐकण्याला । पुढचा विचार पुढें करूं ॥२०॥ ऐसा विचार करून । भागीसी बोलला जाण । अंजनगांवालागून । चाल येतों तुझ्यासवें ॥२१॥ दोघांचा विचार झाला । पुंडलिक रात्रीं स्वस्थ निजला । तों तीन प्रहर रात्रीला । काय घडलें तें ऐका ॥२२॥ पुंडलिकाच्या समोर । एक पुरुष दिगंबर । उभा राहिला साचार । थेट समर्थांच्या परी ॥२३॥ पुरुष म्हणे रे पुंडलिका । अंजनगांवासी जातोस कां ? । गुरु करायातें निका । त्या भागीच्या सल्ल्यानें ॥२४॥ जातोस तरी जावें त्वरित । त्याचें नांव काशीनाथ । तेथें जातां फिटेल भ्रांत । तुझी वेड्या निश्चयें ॥२५॥ कानांत कांहीं बोलला । म्हणून कां तो गुरु झाला । लोक कानगोष्टीला । किती तरी करतात ॥२६॥ मग ते एकमेकांचे । काय गुरु होती साचे । नादीं दंभाचाराचे । त्वां पुंडलिका पडूं नये ॥२७॥ तूं इकडे करी कान । मंत्र देतों तुजकारण । ' गण गण ' ऐसें बोलून । महाराज स्तब्ध जहाले ॥२८॥ आणखी काय आहे आस । ती मी आज पुरवीन खास । ऐसे ऐकतां पुंडलिकास । आनंद अति जाहला ॥२९॥ पाहूं लागला निरखून । स्वप्नीं त्या पुरुषालागून । तों पाहिलें गजानन । शेगांवचे स्वामी पहा ॥३०॥ पुंडलिक म्हणे गुरुराया । पादुका द्या ह्या मला सदया । नित्य पूजा करावया । यावीण आणखी आस नसे ॥३१॥ बरें उद्या दोन प्रहर । दिवस येतां साचार । पादुकांची पूजा कर । ह्या मी दिधल्या घेई तुला ॥३२॥ पादुका त्या घ्यावयाला । स्वप्नीं पुंडलिक उठून बसला । तोंच आली तयाला । साक्षात् जागृति श्रोते हो ॥३३॥ जागा होऊनी सभोंवार । पाहूं लागला साचार । तो कोणीच दिसेना अखेर । नाहीं पत्ता पादुकांचा ॥३४॥ उलगडा कांहीं होईना । संशय मनींचा जाईना । म्हणे स्वामींच्या भाषणा । बाट न लागला आजवरी ॥३५॥ स्वप्नीं येऊन दर्शन । त्यांनीं दिलें मजकारण । कशी भागी ठाकरीण । तेंही स्वप्नीं कथन केलें ॥३६॥ तैसेंच उद्यां दोन प्रहरीं । पादुकांची पूजा करी । ऐसें बोलले साक्षात्कारी । त्याचा समजूं काय अर्थ ? ॥३७॥ किंवा नव्या पादुका करून । म्यां करावें पूजन । ऐसें त्यांचें आहे मन । हें कांहीं कळेना ॥३८॥ मी पदींच्या मागितल्या । पादुका त्या होत्या भल्या । त्याच त्यांनीं मसी दिल्या । मग नव्या घेऊं कशास ? ॥३९॥ ऐसें नाना तर्क करी । पुंडलिक आपल्या अंतरीं । तों इतक्यांत आली घरीं । भागी ठाकरीण बोलावण्या ॥४०॥ अंजनगांवीं चाल आतां । मोक्ष गुरू करण्याकरितां । दिसूं लागला आहे आतां रस्ता । अरुणोदयाचे प्रकाशें ॥४१॥ पुंडलिक म्हणे भागाबाई । मी कांहीं येत नाहीं । मर्जी असल्यास तूंच जाई । अंजनगांवाकारणें ॥४२॥ मीं जो एकदां गुरु केला । श्रीगजानन महाराजाला । तो न आतां सोडी भला । हाच माझा निश्चय ॥४३॥ तें ऐकतां भागाबाई । अंजनगांवास गेली पाही । आतां मुंडगांवाचें ठाईं । काय झालें तें ऐका ॥४४॥ झ्यामसिंग रजपूत । गेला होता शेगांवांत । दर्शन स्वामींचें घेण्याप्रत । दोन दिवस याच्या आधीं ॥४५॥ तो जेव्हां मूंडगावाला । येण्या परत निघाला । तईं बाळाभाऊला । ऐसें बोलले महाराज ॥४६॥ या पादुका पुंडलिकासी । द्याया देई याच्यापासी । समर्थ आज्ञा होतां ऐसी । तैसेंच केलें बाळानें ॥४७॥ करीं घेऊन पादुका । झ्यामसिंगास बोलला देखा । भोकरे जो का पुंडलिका । तुमच्या गांवींचा असे हो ॥४८॥ त्यास ह्या द्या नेऊन । करायासी पूजन । तें झ्यामसिंगें ऐकून । पादुका घेतां जहाला ॥४९॥ झ्यामसिंग आला मुंडगांवांत । तों पुंडलिक भेटला वेशींत । पुसूं लागला त्याप्रत । कुशलवृत्त समर्थांचें ॥५०॥ प्रसाद मला द्यावयासी । कांहीं दिला का तुम्हांपासी ? । हें ऐकतां झ्यामसिंगासी । महदाश्चर्य वाटलें ॥५१॥ सवें घेऊन पुंडलिकाला । झ्यामसिंग घेऊन घरीं गेला । खोदून विचारूं लागला । तूं ऐसें कां विचारिलें ? ॥५२॥ पुंडलिकानें स्वप्नाची । गोष्ट त्याला कथिली साची । ती ऐकतां झ्यामसिंगाची । भ्रांति नष्ट झाली हो ॥५३॥ लगेच पादुका काढिल्या । पुंडलिकाच्या हातीं दिल्या । त्याच अजून आहेत भल्या । मुंडगांवांत त्याच्या घरीं ॥५४॥ दोन प्रहरीं पूजन । पुंडलिकानें केलें जाण । मनोभावें करून । त्या प्रसादी पादुकांचें ॥५५॥ पहा श्रोते खरें संत । सांभाळिती आपुलें भक्त । आडमार्गानें किंचित् । जाऊं न देती तयांला ॥५६॥ निज भक्ताचे मनोरथ । समर्थ कैसे पुरवितात । तें येईल ध्यानांत । या कथेतें ऐकतां ॥५७॥ एक माध्यंदिन ब्राह्मण । कवर राजाराम म्हणून । होता धंदा करून । अकोल्यांत सराफीचा ॥५८॥ सोने चांदी भुसार । घेणें देणें साचार । मध्यम प्रतीचा सावकार । हा राजाराम कवर असे ॥५९॥ या राजारामाप्रती । महाराजाची होती भक्ती । म्हणून त्याची संतती । मानूं लागली समर्था ॥६०॥ या कवराकारण । दोन पुत्र होते जाण । गोपाळ त्र्यंबक म्हणून । लव्हांकुशांसारिखे ॥६१॥ कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती । भाऊस व्यवहारीं बोलती । तो हैद्राबादेप्रती । गेला डाँक्टरी शिकावया ॥६२॥ लहानपणापासून । भाऊस होतें देवध्यान । म्हणजे त्र्यंबकालागून । हें येथें विसरूं नका ॥६३॥ कांहीं संकट पडल्यावरी । तो समर्थांचा आठव करी । राहून त्या भागानगरीं । मुसा नदीच्या कांठाला ॥६४॥ एवंच भाऊ भक्तिमान । होता लहानपणापासून । त्याचें दैवत गजानन । स्वामी शेगांवग्रामींचें ॥६५॥ तो सुटीमाजीं आला घरीं । इच्छा उपजली अंतरीं । जाऊनिया शेगांवनगरीं । जेवूं घालावें महाराजा ॥६६॥ पदार्थ त्यांच्या आवडीचे । करोनिया सर्व साचे । परी हें कैसें व्हावयाचें ? । हाच विचार पडला कीं ॥६७॥ भाऊ म्हणे गुरुनाथा । काय तरी करूं आतां । मरून गेली माझी माता । लहानपणींच दयाळा ॥६८॥ घरीं माझें नाही कोणी । एक बंधूची कामिनी । जिचें नांव आहे नानी । स्वभाव तापट तियेचा ॥६९॥ माझ्या आहे ऐसें मनीं । आपण करावी मेजवानी । आपुल्या आवडीचे करोनी । पदार्थ सारे गुरुराया ! ॥७०॥ भाकरी ती ज्वारीची । कांदा भाजी आंबाड्याची । ऊन पिठलें हिरवी मिर्ची । ऐसें तयार करावें ॥७१॥ हे पदार्थ करण्याला । सांगूं कसा मी भावजईला ? । हट्ट एक करण्याला । माता तेंच स्थान असे ॥७२॥ ऐसा विचार करीत । भाऊ राहिला निवांत । तों कांहीं कामानिमित्त । नानी आली ते ठायां ॥७३॥ नानी दिराला बोलली । चिंता कशाची लागली ? । मुखश्री ती म्लान झाली । तुमची कशानें ये वेळां ? ॥७४॥ भाऊ वदे दीनवाणी । काय तुला सांगूं वहिनी ? । माझे जे कां आले मनीं । विचार ते ये वेळां ॥७५॥ पूर्ण सत्तेवांचून । मनोरथ ना होती पूर्ण । म्हणून तुला सांगून । काय करणें आहे गें ॥७६॥ नानी म्हणे त्यावर । सांगून पहा एकवार । तूं माझा धाकटा दीर । मशीं पडदा ठेवूं नये ॥७७॥ ज्येष्ठ भ्राता पित्यापरी । तत् कांता माय खरी । मानिली पाहिजे साजिरी । तें तुम्ही जाणतसा ॥७८॥ तें ऐकून भाऊ हंसला । नानीप्रती बोलता झाला । नानी माझ्या मनाला । आज ऐसें वाटतें ॥७९॥ गजाननाच्या आवडीचे । सर्व पदार्थ करून साचे । आहेत मला न्यावयाचे । त्यांना द्याया शेगांवीं ॥८०॥ तें तूं जरी करशील । तरी तुलाही लागेल । पुण्य आणि होईल । काम माझें त्यायोगें ॥८१॥ तें ऐकतां बोले नानी । दिराप्रती हास्यवदनीं । यासाठींच कां हो मनीं । सचिंत तुम्हीं बैसलात ? ॥८२॥ सांगा आहे काय कारणें । मजला स्पष्ट शब्दानें ? । कांहीं ना आपुल्या गेहीं उणें । कृपेनें गजाननाच्या ॥८३॥ मग भाऊनें सर्व कांहीं । निवेदन केलें तिला पाही । तीही लागली लवलाही । आनंदानें स्वयंपाका ॥८४॥ भाजी चून भाकर । हिरव्या मिरच्या ओंजळभर । ठेविल्या आणून समोर । आपुल्या त्या दिराच्या ॥८५॥ भाकरी तीन, कांदे तीन । हरभर्याचें चून जाण । लोणी ठेविलें माखून । प्रत्येक त्या भाकरीला ॥८६॥ नानी म्हणाली दिराला । जा आतां शेगांवाला । वेळ थोडका राहिला । आहे पाहा गाडीस ॥८७॥ ती गाडी चुकल्यावरी । वाया जाईल तयारी । भोजनाच्या वेळेवरी । गेलांत तरी उपयोग ॥८८॥ ऐसेम नानीं बोलतां । भाऊ निघाला तत्त्वतां । पुसूनियां आपुल्या ताता । येतां झाला स्टेशनासी ॥८९॥ तों गाडी बाराची । निघूनियां गेली साची । तेणें चित्तवृत्ति भाऊची । होती झाली शोकाकुल ॥९०॥ अति हिरमोड त्याचा झाला । पाणी आलें लोचनांला । म्हणे महाराज कां हो केला । अव्हेर माझा ये कालीं ? ॥९१॥ मी मुळींच हीन दीन । कोठून घडावें मला पुण्य ? । आम्हां कावळ्यांकारण । लाभ केवीं मानसाचा ॥९२॥ अक्षम्य ऐसी कोणती । चुकी झाली माझ्या हातीं । म्हणून माझी गुरुमूर्ति । गाडी चुकली ये वेळां ? ॥९३॥ हाय हाय हे दुर्दैवा ! । त्वां माझा साधिला दावा । माझ्या करीं गुरुसेवा । घडूं न दिली आज तूं ॥९४॥ ही माझी शिदोरी । ऐशीच आज राहिली जरी । नाहीं करणार भोजन तरी । सत्य सत्य त्रिवाचा ॥९५॥ गुरुराया कृपारासी । नका उपेक्षूं लेंकरासी । ही शिदोरी सेवण्यासी । यावें धांवून सत्वर ॥९६॥ थोर आपुला अधिकार । क्षणांत पहातां केदार । मग या या येथवर । कां हो अनमान करितसां ? ॥९७॥ मी न आज्ञा तुम्हां करितों । प्रेमानें हांका मारितों । म्हणूनियां हा न होतो । अपमान तुमचा यत्किंचित् ॥९८॥ तीन घंटे अजून । अवकाश गाडीकारण । तोंवरी आपुलें भोजन । होईल ऐसें वाटतें ॥९९॥ ऐसा विचार करीत । तेथेंच बैसला उपोषित । चतुर्थ प्रहरीं शेगांवांत । आला तिहीच्या गाडीनें ॥१००॥ कवर गेला दर्शना । तईं तो योगीराणा । न करितां भोजना । बसला होता आसनीं ॥१॥ नैवेद्याची अतोनात । ताटें होतीं मठांत । पक्वान्नांनीं परिप्लुत । तीं वर्णावी कोठवरी ? ॥२॥ कोणाच्या जिलब्या घीवर । कोणाचा तो मोतीचूर । कोणाची ती नुसती खीर । श्रीखंड पुर्या कोणाच्या ॥३॥ परी त्या नैवेद्याला । समर्थांनीं ना स्पर्श केला । वरच्यावरी ताटाला । बाळा आणून ठेवीं पुढें ॥४॥ आणि म्हणे हें करा ग्रहण । गेला एक वाजून । आपुलें न झाल्या जेवण । प्रसाद भक्तां मिळतो कसा ? ॥५॥ त्यांची ते वाट पाहती । करण्या आपणां विनंति । त्यांची नसे होत छाती । म्हणून मी बोललों ॥६॥ तैं महाराज म्हणती थांब जरा । आग्रह नको करूंस खरा । आज भोजन चौथे प्रहरा । माझें होणार आहे रे ॥७॥ मर्जी असल्यास थांबावें । ना तरी खुशाल जेवावें । नैवेद्य घेऊनि घरा जावें । पर्वा नाही त्याची मला ॥८॥ ऐसा प्रकार तेथें झाला । तों इतुक्यांत भाऊ आला । समर्थ पाहतां आनंदला । भाऊ आपल्या मानसीं ॥९॥ दुरावलेली माय जेवीं । बाळकें दृष्टि पहावी । झालें असे पहा तेवीं । भाऊ कवराकारणें ॥११०॥ समर्थासी नमस्कार । केला साष्टांग साचार । उभा राहिला जोडोनी कर । वाट पाहत आज्ञेची ॥११॥ त्या भाऊस पाहून । समर्थें केलें हास्यवदन । बरेंच दिलेंस आमंत्रण । ही कां वेळ जेवण्याची ? ॥१२॥ तुझ्या भाकेंत गुंतलों । मी उपोषित राहिलों । नाहीं अजून जेवलों । आण तुझी शिदोरी ॥१३॥ ऐसें महाराज बोलतां । हर्षलासे कवर चित्ता । म्हणे काय करूं गुरुनाथा । गाडी चुकली बाराची ॥१४॥ कवरास म्हणे बाळाभाऊ । आतां नको दुःखित होऊं । काय आणलें आहेस पाहूं ? । समर्थासी जेवावया ॥१५॥ ऐसें ऐकतां सत्वरीं । कांदे भाजी भाकरी । कवरानें ठेविल्या समोरी । स्वामी गजाननाच्या ॥१६॥ त्यांतील भाकरी दोन । समर्थें केल्या भक्षण । एकीची तो प्रसाद म्हणून । अवघ्या भक्तां वांटिली ॥१७॥ तो प्रकार पहातां । आश्चर्य झालें समस्तां । कळली स्वामींची योग्यता । खरेच भक्तवत्सल ते ॥१८॥ जेवीं हस्तिनापुरांत । भगवंतानें ठेविला हेत । सोडून पक्वानाप्रत । विदुराच्या हुलग्यांवरी ॥१९॥ तैसेंच येथें आज झालें । आमचें पक्वान्न नाहीं रुचलें । भाकरीवरी गुंतलें । चित्त कवराच्या स्वामींचें ॥१२०॥ भाऊंनीही घेतला । सनर्थप्रसाद शेगांवला । सद्भाव येथें उदेला । तेथें ऐसेंच होणार ॥२१॥ समर्थ बोलले कवरासी । जा आतां अकोल्यासी । पास होशील पुढचे वर्षी । तूं डाँक्टरी परीक्षेंत ॥२२॥ भाऊ म्हणे गुरुराया । आपुली असूं द्यावी दया । यांविण दुसरें मागावया । मी न आलों ये ठाया ॥२३॥ आपुले हे दिव्य चरण । हेंच माझें धनमान । सर्वदा घडो चिंतन । आपल्या दिव्य मूर्तीचें ॥२४॥ ऐसें बोलून अकोल्याला । भाऊ कवर निघून गेला । समर्थ आपल्या भक्ताला । नुपेक्षिती कधींही ॥२५॥ शेगांवींचा राहणार । तुकाराम शेगोकार । एक होता भाविक नर । कृषिकर्म करीतसे ॥२६॥ घरची गरीबी होती खरी । काम करोनी शेतांतरीं । अस्तमानाचे अवसरीं । दर्शना यावें मठांत ॥२७॥ चिलीम द्यावी भरून । घ्यावें पदाचें दर्शन । कांहीं वेळ बसून । जावें पुन्हां शेतांतें ॥२८॥ ऐसा नित्यक्रम तयाचा । बहुत दिवस चालला साचा । घाला विचित्र दैवाचा । तो न कोणा सोडितसे ॥२९॥ जें जें असेल दैवांत । तें तें श्रोते घडून येत । एके दिनीं शेतांत । असतां तुकाराम आपुल्या ॥१३०॥ तों एक आला शिकारी । बंदुक ज्याच्या खांद्यावरी । नेम धरून ससे मारी । छरे घालून बंदुकींत ॥३१॥ ती प्रभातीची होती वेळा । सूर्य नुकतां उदयाला । तुकाराम होता बसला । आपल्या शेंती शेकत ॥३२॥ तों त्याच्या मागें कुपाटिला । एक होता बसलेला । ससा शुभ्र तोचि पडला । शिकार्याच्या दृष्टीसी ॥३३॥ त्याची शिकार करण्या भली । शिकार्यानें आपुली । नेम धरून झाडिली । खांद्यावरील बंदुक ॥३४॥ त्यायोगें ससा मेला । एक छरा लागला । त्या तुकाराम माळ्याला । कानामागें अवचित ॥३५॥ छरा मोठा जोरदार । मस्तकीं शिरला अखेर । थकले अवघे डाँक्टर । प्रयोग करून त्याचेवरी ॥३६॥ कांहीं केल्या निघेना । छरा तो डाँक्टरांना । होऊं लागल्या यातना । तुकारामासी अतिशय ॥३७॥ मस्तक दुखे अहोरात्र । निद्रा न लागे किंचित । नवस सायास केले बहुत । परी गुण येईना ॥३८॥ ऐशाही अवस्थेंत । यावें त्यानें मठांत । एके दिवशीं तो समर्थांचा एक भक्त । ऐसें बोलला तयाला ॥३९॥ डाँक्टर वैद्य सोडा आतां । साधूचिया सेवेपरता । नाहीं उपाय कोणता । उत्तम या जगामध्यें ॥१४०॥ कृपा त्यांची झाल्यास । चुकेल हा तुझा त्रास । झाडीत जा आसपास । या मठाच्या नित्य तूं ॥४१॥ तेव्हां सेवा ही घडेल । पुण्य़ तेंही लाधेल । कृपा झाल्या होशील । त्रासापासून मोकळा ॥४२॥ मात्र आपुल्या पित्यावरी । दांभिकतेनें हें ना करी । शुध्द भाव अंतरीं । सर्वकाळ धरावा ॥४३॥ तें तुकारामासी मानवलें । झाडणें त्यानें सुरूं केलें । अवघ्या मठास ठेविलें । स्वच्छ त्यानें आरशापरी ॥४४॥ ऐसीं चौदा वर्षें झालीं । तुकारामाई सेवा भली । तईं गोष्ट घडून आली । ऐशा रीतिं श्रोते हो ॥४५॥ झाडतां झाडतां कानांतून । छरा पडला गळून । जैसी कांती भोकरांतून । दावितां सुटे आंठोळी ॥४६॥ तैसें साच येथें झालें । छरा पडतां थांबलें । दुखावयाचें मस्तक भलें । ऐसा प्रभाव सेवेचा ॥४७॥ ही सेवा झाडण्याची । अखेरपर्यंत केली साची । प्रचीतिवीण कवणाची । परमार्थीं न निष्ठा बसे ॥४८॥ ती एकदां बसल्यावर । मग मात्र होते स्थिर । संतसेवा महाथोर । हे भाविक जाणती ॥४९॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । तारक होवो भाविकांप्रत । भवसिंधुमाझारीं ॥१५०॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति षोडशोऽध्यायः समाप्तः ॥
अद्याय 15 वा अद्याय 16 वा अद्याय 17 वा अद्याय 18 वा अद्याय 19 वा अद्याय 20 वा अद्याय 21 वा
No comments:
Post a Comment