अध्याय १२
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे गणाधीशा गणपती । मयुरेश्वरा विमलकीर्ति । माझ्या हृदयीं करून वस्ती । ग्रंथ कळसास नेई हा ॥१॥ तूं ज्ञानबुध्दीचा दाता । तूं भक्तमनोरथ पुरविता । विघ्ननगातें संहारिता । तूंच एक गणराया ॥२॥ तूं साक्षात् चिंतामणी । चिंतिलेलें देशी जाणी । आपुल्या भक्तांलागूनी । ऐसें पुराणें म्हणतात ॥३॥ माझ्या मनींची अवघी चिंता । लयास नेई एकदंता । लंबोदरा पार्वतीसुता । भालचंद्रा सिंदुरारे ॥४॥ असो बच्चुलाल अग्रवाला । होता एक आकोल्याला । धन-कनक- संपन्न भला । मनाचाही उदार जो ॥५॥ त्यानें हकिकत कारंज्याची । म्हणजे लक्ष्मण पंत धुड्याची । कर्णोपकर्णी ऐकली साची । तेणें साशंक जहाला ॥६॥ तें खरें खोटें पहाण्यास । विचार करी चित्तास । तों एके समयास । महाराज आले अकोल्याला ॥७॥ येऊन बच्चुलाला घरीं । बैसते झाले ओट्यावरी । कीं गजानन साक्षात्कारी । भक्त आपुला जाणून ॥८॥ बच्चुलाला आनंद झाला । तो समर्थांसी ऐसें वदला । आज गुरुराया वाटतें मला । आपली पूजा करावी ॥९॥ ऐसें ऐकतां भाषण । समर्थेम तुकविली मान । जें साक्षात् असें चिन्ह । श्रोते संमती दिल्याचें ॥१०॥ बच्चुलालानें तयारी । तात्काळ केली ओट्यावरी । षोडशोपचारेम अत्यादरीं । पूजन त्यानें आरंभिलें ॥११॥ प्रथमतः घातलें मंगलस्नान । नानाविध उटणीं लावून । मग करविलें परिधान । वस्त्र पीतांबर जरीचा ॥१२॥ शालजोडी अंगावरी । बहुमोल घातली काश्मीरी । एक जरीचा रुमाल शिरीं । अभ्रेस्मी आणून बांधिला ॥१३॥ गोफ घातिला गळ्यांत । सलकडीं तीं हातांत । कराच्या दाही बोटांत । मुद्रिका घातल्या नानापरी ॥१४॥ बहुमोल हिर्याची । वामकरीं घातिली पौची । रत्नजडित कंठ्याची । कंठीं शोभा विशेष ॥१५॥ जिलबी राघवदास पेढे । नैवेद्यास ठेविले पुढे । त्रयोदश गुणी ठेविले विडे । एक्या लहान तबकांत ॥१६॥ अष्टगंध अर्गजा अत्तर । सुवासिक लाविलें फार । त्यानें अवघ्या अंगभर । गुलाबपानी शिंपडीलें ॥१७॥ एका सुवर्णाच्या ताटीं । दक्षिणा ठेविली शेवटीं । ती होती फार मोठी । रुपये होन मोहोरांची ॥१८॥ बेरीज करतां दहा हजार । येईल ती साचार । ऐशी दक्षिणा होती थोर । किती करूं वर्णन तिचें ॥१९॥ श्रीफल पुढें ठेवून । विनयें केलें भाषण । महाराज माझें इच्छी मन । राममंदिर बांधावया ॥२०॥ या माझ्या ओट्यावरी । अडचण होतसे भारी । मंडप तो घातला जरी । उत्सवासी गुरुराया ॥२१॥ त्या माझ्या मनोरथा । पूर्ण करी ज्ञानवंता । ऐसें म्हणून ठेविला माथा । अनन्य भावें पायांवरी ॥२२॥ त्यावरी साधु गजानन । देते झाले आशीर्वचन । श्रीजानकीजीवन । तुझा करील पूर्ण हेतू ॥२३॥ असो आज तूं हें काय केलें ? । मला पोळ्याचा बैल बनविलें । हे अलंकार घालून भले । याचें काय कारण ? ॥२४॥ मी न बैल पोळ्याचा । अथवा घोडा दसर्याचा । मला या दागदागिन्यांचा । काय सांग उपयोग ? ॥२५॥ अरे हें अवघें विष । मला नको त्याचा स्पर्श । या नसत्या उपाधीस । माझ्या मागें लावूं नको ॥२६॥ अथवा तूं मोठा श्रीमान् । हें दाखवाया कारण । केलेंस कां हें प्रदर्शन । सांग मसी बच्चुलाला ? ॥२७॥ जें आवडतें जयासी । तेंच द्यावें तयासी । मी वेडापिसा संन्याशी । नागवा फिरतों गांवभर ॥२८॥ हें अवघें तुझें तुला । लखलाभ असो बच्चुलाला । तुम्हां प्रापंचिकाला । या द्रव्याची जरूर ॥२९॥ माझा यजमान भीमातटीं । उभा विटेसी जगजेठी । तो काय माझ्यासाठीं । हें वैभव द्याया तयार नसे ? ॥३०॥ ऐसें म्हणून काढिले । दागिने अंगावरचे भले । चहूं बाजूंस फेकियले । वस्त्रांचीही तीच गती ॥३१॥ दोन पेढे खाऊन । निघून गेले गजानन । हा प्रकार अवलोकून । केला शोक अकोल्यांत बहुतांनीं ॥३२॥ त्यांत कांहीं कारंज्याचे । लोक हजर होते साचे । ते म्हणती आपुल्या वाचें । अभागी आमुचा लक्ष्मण ॥३३॥ त्यानें बच्चुलालापरी । पुजन केलें आपुल्या घरीं । परी कचरला अंतरीं । मोह धनाचा धरून ॥३४॥ वरघडीचें भाषण । केलें विनय दाखवून । ते कां समर्थाकारण । समजणें अशक्य आहे हो ? ॥३५॥ जेवीं पूजा दांभिकांची । शब्दमयी असते साची । पूर्तता महावस्त्राची । होती त्यांची अक्षतेनें ॥३६॥ ' शर्कराखंडखाद्यानि ' । ऐसें म्हणोनिया वदनीं । कुचका दाणा आणोनी । ठेवी पुढें भुईमुगाचा ! ॥३७॥ अशा दांभिक पूजनाचें । फलही त्याच स्वरूपाचें । वाटोळें लक्ष्मणाचें । याच कृतीनें झालें हो ॥३८॥ हा बच्चुलाल धन्य धन्य । जैसें केलें भाषण । तैसेंच ठेविलें वर्तन । जवाहून न आगळें ॥३९॥ आतां याच्या वैभवाला । ओहोट हा ना शब्द उरला । संतकृपा झाली ज्याला । तो सुखीच राहातसे ॥४०॥ बच्चुलालांनीं तपास । केला अवघ्या अकोल्यास । परी न लागला थांग त्यास । समर्थांचा कोठेंही ॥४१॥ असो एक पितांबर नांवाचा । शिष्य शिंपी जातीचा । होता गजानन महाराजांचा । शेगांवीं मठामध्यें ॥४२॥ त्यानें सेवा बहुत केली । तपश्चर्या फळा आली । एके दिनीं ऐसी झाली । गोष्ट ऐका मठांत ॥४३॥ फाटकें तुटकें धोतर । नेसला होता पितांबर । तें पाहून गुरूवर । ऐशा रीतीं बोलले ॥४४॥ अरे तुझें नांव पितांबर । नेसण्या न धडकें धोतर । ढुंगणास पाहाती नारीनर । तें तरी झांक वेड्या ! ॥४५॥ नांव म्हणे सोनुबाई । हातीं कथलाचाही वाळा नाहीं । नांव पाहतां गंगाबाई । आणि तडफडे तहानेनें ॥४६॥ तशांतलाच प्रकार । आहे तुझा साचार । हें फाटकें धोतर । पोतेर्यांच्या उपयोगी ॥४७॥ तेंच नेसून बैससी । ढुंगण जगाला दाविसी । हा घे दुपेटा देतों तुसी । नेसावयाकारणें ॥४८॥ तो न करितां अनमान । राहे बाळा नेसून । यासी नको सोडूं जाण । कोणी काहीं केलें तरी ॥४९॥ पितांबरा दुपेटा नेसला । हें असह्य झालें इतरांना । भाऊच घातकी भावाला । होतो स्वार्थ दृष्टीनीं ॥५०॥ तो वेडावांकडा प्रकार । कशास बोलूं साचार । गटाराचें उघडितां द्वार । घाण मात्र सुटते हो ॥५१॥ श्रीगजानन स्वामीप्रत । शिष्य होते असंख्यांत । परी अधिकारी तयांत । दोही हातांच्य बोटांइतके ॥५२॥ पाहा श्रोते कांतारीं । वृक्ष असती नानापरी । त्यांतून क्वचित् कोठें तरी । नजरेस पडती चंदनतरु ॥५३॥ त्यापरीच होते येथें । त्यांच्या शिष्यमंडळीतें । काहीं शिष्य पितांबरातें । टोचूं लागले निरर्थक ॥५४॥ हेंच कां तुझें शिष्यपण । वस्त्र करिसी परिधान । जें कां समर्थाकारण । ल्यावयाच्या उपयोगी ॥५५॥ तुझी भक्ति कळून आली । तूं खुशालचंद अससी मुळीं । तूं राहूं नको ये स्थळीं । अपमान करण्या सद्गुरुचा ॥५६॥ तैं पितांबर म्हणाला । मी न गुरूचा अपमान केला । उलट मान ठेविला । आज्ञा ऐकून तयांची ॥५७॥ वस्त्र हें मज त्यांनीं दिलें । नेसावया सांगितलें । तेंच मीं हो परिधान केलें । ही कां झाली अवज्ञा ? ॥५८॥ ऐसी भक्ती न भक्ती झाली । शिष्यांत तेढ माजली । ती मिटवाया माव केली । ऐशा रीतीं गजाननें ॥५९॥ पितांबरास म्हणती गुरुवर । तूं येथून जावें दूर । जाणतें मूल झाल्यावर । आई त्याला दूर ठेवी ॥६०॥ माझी कृपा आहे खरी । हे पितांबरा तुजवरी । जा हिंडून भूमीवरी । पदनतासी तारावें ॥६१॥ डोळ्यांत आसवें आणून । करूनिया साष्टांग नमन । मागें पाहे फिरफिरून । सोडून जातां मठासी ॥६२॥ पितांबर आला कोंडोलीसी । बसला वनांत आंब्यापासी । चिंतन चाललें मानसीं । निजगुरुचें सर्वदा ॥६३॥ तेथें होता रात्रभर । उदया येतां दिनकर । जाऊन बसला झाडावर । मुंगळ्यांचिया त्रासानें ॥६४॥ अवघ्या आम्रवृक्षावरी । मुंग्या मुंगळे होते भारी । लहान थोर फांद्यांवरी । आला पितांबर जाऊन ॥६५॥ परी निर्भय ऐसें सांपडेना । स्थान तयासी बसण्या जाणा । हेंच कृत्य गुराख्यांना । कौतुकास्पद वाटलें ॥६६॥ ते म्हणाले आपसांत । हा माकडापरि कां रे फिरत? । ह्या वृक्षावरी सत्य । हें कांहीं कळेना ॥६७॥ लहान सान फांदीला । हा निर्भयपणें फिरून आला । परी नाहीं खालीं पडला । हेंच आहे आश्चर्य ! ॥६८॥ दुसरा म्हणाला यांत कांहीं । आश्चर्य वाटण्याजोगें नाहीं । श्रीगजाननाच्या शिष्यांठायीं । ऐसें सामर्थ्य असतें रे ॥६९॥ यावरून हा त्यांचा । शिष्य असावा खचित साचा । चला हा येथ आल्याचा । वृतान्त सांगूं गांवांत ॥७०॥ गोपमुखें वृत्त कळलें । कोंडोलीचे लोक आले । आम्रवृक्षापासीं भले । कोण आले तें पहावया ॥७१॥ म्हणाले पौरवासी नर । हा ढोंगी असावा साचार । बळेंच करितो वेडेचार । गजाननाच्या शिष्यापरी ॥७२॥ शिष्य गजानन महाराजांचा । भास्कर पाटील होता साचा । झाला नुकताच अंत त्याचा । अडगांव नामें ग्रामांत ॥७३॥ समर्थांचे शिष्य । येथें येतील कशास ? । वळें करण्या उपवास । सोडून बर्फी पेढ्याला ॥७४॥ पुसून एकदां यास पहावें । तो काय म्हणतो तें ऐकावें । मग खरें खोटें ठरवावें । उगीच तर्क नाहीं बरा ॥७५॥ एक मनुष्य पुढें झाला । पितांबरासी पुसूं लागला । तूं कोण कोठील कशास आला ? । गुरू तुझा कोण असे ? ॥७६॥ पिंतांबर बोले त्यावर । मी शेगांवचा रहाणार । मी शिंपी पितांबर । शिष्य गजानन स्वामींचा ॥७७॥ त्यांची आज्ञा मजलागून । करण्या झाली पर्यटण । म्हणून येथें येऊन । वृक्षापासी बैसलों ॥७८॥ तों आंब्याच्या मुळाशीं । मुंगळे होते बहुवसी । म्हणून बसलों फांदीसी । वृक्षावरी जाऊन ॥७९॥ ऐसें ऐकतां तद्भाषण । लोक कोपले दारूण । अरे मोठ्याचें नांव सांगून । चेष्टा ऐशा करूं नको ॥८०॥ काय म्हणे मी राजाची । राणी आवडती आहे साची । खळगी भरण्या पोटाची । आले मजूरी करावया ॥८१॥ देशमुख त्या गांवींचा । शामराव नामें साचा । तो बोलला ऐसी वाचा । अरे सोंगाड्या ऐक हें ॥८२॥ स्वामी समर्थ गजानन । प्रत्यक्ष आहे भगवान । त्यांचें नांव सांगून । बट्टा त्यांना लावूं नको ॥८३॥ अरे वेड्या एक्या काळीं । त्यांनीं ऐसी कृति केली । ऋतु नसतां आणवलीं । फळें आम्र-वृक्षाला ॥८४॥ त्यांनीं फळें आणवलीं । तूं नुसतीं पाने आण भलीं । नाहीं तरी या स्थलीं । तुझी न धडगत लागेल ! ॥८५॥ हा बळीराम पाटलाचा । वृक्ष वठलेला आंब्याचा । तो पर्णयुक्त करी साचा । आमच्या देखत ये काळीं ॥८६॥ ऐसें न जरी करशील । तरी मार खाशील । खरा असल्यास होशील । वंद्य आम्हांकारणें ॥८७॥ कां कीं शिष्य सद्गुरुचे । कांहीं अंशीं निघती साचे । बापा त्यांच्याच तोडीचे । हा आहे न्याय जगीं ॥८८॥ नको करूं उशीर । हा आंबा करी हिरवागार । तें ऐकतां पितांबर । गेला असे घाबरून ॥८९॥ बोलला ऐसें नाडूं नका । माझी सारी कथा ऐका । एका खाणींत निघती देखा । हिरे आणि गारा हो ॥९०॥ तैसाच मी गार परी । गजानन शिष्यांभितरीं । बोललों नाहीं वैखरी । यत्किंचित खोटें हो ॥९१॥ गारेवरून खाणीस । नाहीं येत जगीं दोष । मी निज गुरूच्या नांवास । चोरून कैसें ठेवावें ? ॥९२॥ शामराव म्हणे त्यावर । नको करूं चरचर । संकट शिष्यांस पडतां थोर । ते धांवा करिती सद्गुरुंचा ॥९३॥ मग तो शिष्य त्यांचा जरी । नसला कृतीनें अधिकारी । तरी सद्गुरूचा प्रभाव करी । साह्य त्या आपुल्या शिष्यांस ॥९४॥ ऐसी झाली आड-विहीर । पितांबरासी साचार । झाला बिचारा चिंतातुर । कांहीं न सुचे तयासी ॥९५॥ त्या वठलेल्या झाडापासी । मिळाले अवघे पौरवासी । काय होतें तें पहावयासी । मुलें बायकांसमवेत ॥९६॥ निरुपाय होऊनी अखेर । पितांबरानें जोडिलें कर । स्तवन मांडिलें अपार । आपुल्या सद्गुरुरायाचें ॥९७॥ हे स्वामी समर्थ गजानना ! । ज्ञानांबरीच्या नारायणा । पदनताच्या रक्षणा । धांव आतां ये काळीं ॥९८॥ माझ्यामुळें दोष तुला । येऊं पहातो भक्तपाला । आपुल्या ब्रीदासाठीं पाला । आणीव आम्रवृक्षासी ॥९९॥ माझी भिस्त तुझ्यावरी । पाव मातें लवकरी । नातरी आली पाळी खरी । मजला येथें मरण्याची ॥१००॥ प्रल्हाद खरा करण्याला । स्तंभीं नरहरी प्रगटला । जनी चढवितां सुळाला । त्याचें पाणी जहालें ॥१॥ जनीचा भार देवावर । माझा आहे तुजवर । संतदेवांत अंतर । मुळींच नाहीं राहिलें ॥२॥ देव तेची असती संत । संत तेची देव साक्षात् । मला लोक म्हणतात । शिष्य गजाननाचा ॥३॥ माझें कांहीं महत्त्व नाहीं । तें अवघें तुझ्याठायीं । पुष्पामुळें किंमत येई । जगीं सूत्राकारणें ॥४॥ तूं पुष्प मी आहे सूत । तूं कस्तुरी मी माती सत्य । तुझ्यामुळें आलें येथ । संकट हें माझ्यावरी ॥५॥ आतां न माझा अंत पाही । गुरुराया ! धांव घेई । या वठलेल्या वृक्षाठायीं । आणि पर्णे कोमल ॥६॥ लोकांस म्हणे पीतांबर । करा सद्गुरूचा नामगजर । जय जय गजानन साधुवर । शेगांवच्या अवलिया ॥७॥ लोक अवघे गजर करती । तों पालवी फुटली वृक्षाप्रती । जन नयनीं पाहती । त्या अगाध कौतुकाला ॥८॥ कोणी म्हणती असेल स्वप्न । तें जें पडलें आपणांलागून । पहा चिमटा घेऊन । आपुल्याला करांनीं ॥९॥ चिमटे घेऊन पाहाती । तों निमाली स्वप्नभ्रांति । यावरी कोणी ऐसें म्हणती । ही नजरबंदी असेल ! ॥११०॥ गारुड्याच्या खेळांत । वाद्या होती सर्प सत्य । खापर्या असून दृष्टीप्रत । त्याचे रुपये दिसती कीं ॥११॥ तोही भ्रम निमाला । तोडून पहातां पर्णाला । फांदीवाटें तात्काळ आला । चीक शुभ्रसा बाहेर ॥१२॥ मग मात्र खात्री झाली । वाळल्या वृक्षा पालवी फुटली । श्रीगजानन माऊली । खरीच आहे महासंत ॥१३॥ आतां पितांबराविशीं । शंका न धरणें मानसीं । चला घेऊन गांवासी । हा त्यांचा शिष्य असे ॥१४॥ याच्यायोगें करून । कधीं तरी गजानन । येतील कोंडोलीकारण । वांसरासाठीं गाय जसी ॥१५॥ तें अवघ्यांस मानवले । पितांबरासी मिरवीत नेलें । ऐसें जेव्हां दिव्य झालें । तेव्हां भाव उदेला ॥१६॥ जैसा समर्थांनीं आपुला । शिष्य डोमगांवीं पाठविला । कल्याण नामें करून भला । कल्याण करण्या जगाचें ॥१७॥ तैसेंच केलें गुरुवरें । श्रीगजाननें साजिरें । उदेंलें हें भाग्य खरें । त्या कोंडोली गांवचें ॥१८॥ श्रोते अजूनपर्यंत । तो आंबा आहे कोंडोलीत । इतरांपेक्षां असंख्यांत । फळे येती तयाला ॥१९॥ त्या पितांबराचे भजनीं । कोंडोली गांव लागला जाणी । जेथें जाईल हिरकणी । तेथें ती मोल पावे ॥१२०॥ मठ पितांबराचा । कोंडोलींत झाला साचा । आणि अंतही तयाचा । ते ठायीं झाला हो ॥२१॥ आतां इकडे शेगांवांत । महाराज आपुल्या मठांत । एके दिनीं उद्विग्न चित्त । होऊनिया बैसले ॥२२॥ शिष्य त्याचें कारण । पुसूं लागले कर जोडून । महाराज आपुलें मन । कां हो अस्थिर जाहलें ? ॥२३॥ तैं महाराज वदले लोकांला । आमचा कृष्णा पाटील गेला । जो चिकणसुपारी आम्हांला । रोज आणून देत असे ॥२४॥ त्याची झाली आठवण । राम त्याचा मुलगा लहान । आतां सुपारी चिकण । कोण देतो या ठायां ? ॥२५॥ राम थोर झाल्यावरी । करील माझी चाकरी । म्हणून मी या मठांतरीं । आतां ना तयार राहावया ॥२६॥ ऐसें महाराज बोलतां । जनांलागीं लागली चिंता । महाराजांचा विचार आतां । दिसतो येथून जाण्याचा ॥२७॥ म्हणून कसेंही करून । जाऊं न द्यावें त्याकारण । चला आपण धरूं चरण । महाराजांचे येवेळां ॥२८॥ ऐसा विचार मिळून केला । मंडळी आली मठाला । श्रीपतराव बंकटलाला । ताराचंद मारुती ॥२९॥ मंडळींनीं धरिलें चरण । महाराज आम्हां सोडून । तुम्ही आपुलें ठिकाण । राहण्याचें अन्य करूं नये ॥१३०॥ तुमची इच्छा असेल जेथ । तेथेंच राहा शेगांवांत । परी सोडण्याचें मनांत । ग्राम हें आणूं नका ॥३१॥ तैं महाराजवाणी निघाली । तुमच्या गांवांत आहे दुफळी । मला कोणाची जागा मुळीं । नको येथें रहावया ॥३२॥ जी कोणाची नसेल । ऐसी जागा जरी द्याल । तरीच राहणें होईल । माझें या शेगांवीं ॥३३॥ ऐसी गोष्ट ऐकिली । तेव्हां मंडळीं चिंतावली । समर्थांनीं आज्ञा केली । मोठ्या पेंचाची आपणां ॥३४॥ कोणाच्या जागेंत । राहाण्या तयार नाहींत । सरकार यांच्या प्रीत्यर्थ । जागा ती देईल कशी ? ॥३५॥ भूषण आपल्या साधूचें । सरकारास नाहीं साचें । बंकटलाल बोलला वाचें । ऐसें संकट घालूं नका ॥३६॥ सरकार धार्मिक कृत्याला । जागा देईल हा न उरला । भरवंसा तो आम्हांला । हें राज्य परक्याचें ॥३७॥ म्हणून आम्हांपैकीं कोणाची । जागा घ्या मागून साची । आहे तयारी आमुची । ती तुम्हां द्यावयास ॥३८॥ समर्थें केलें भाषण । काय हें तुमचें अज्ञान । जमिनीची मालकी पूर्ण । आहे सच्चिदानंदाची ॥३९॥ राजे कित्येक भूमीवरी । आजवरी झाले तरी । जागा कशाची सरकारी । इचा मालक पांडुरंग ॥१४०॥ व्यवहारदृष्ट्या मालकपण । येतें राजालागून । त्याचें नाहीं भूषण । तुम्ही प्रयत्न करा जा ॥४१॥ जागा मिळेल प्रयत्न करितां । पुढें नका बोलूं आतां । हरी पाटलाच्या हातां । यश येईल निःसंशय ॥४२॥ हरी पाटलाकडे आली । मंडळी ती अवघी भली । त्याच्या सल्ल्यानें मागितली । जागा अर्ज करून ॥४३॥ बुलढाण्याचा सर्वाधिकारी । साहेब होता नामें ' करी ' । त्यानें एक एकर जागा खरी । अर्जावरून दिली असे ॥४४॥ आणि ऐसें म्हणाला । तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला । परी मी तुर्त तुम्हांला । एक एकर देतसे ॥४५॥ तुम्ही एक वर्षांत । जागा केल्या व्यवस्थित । तुमचा मी पुरवीन हेत । जागा आणिक देऊनिया ॥४६॥ तो ठराव सरकारचा । आहे दप्तरीं नमूद साचा । समर्थांच्या वाणीचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥४७॥ मग हरी पाटील बंकटलाला । निघते झाले वर्गणीला । द्रव्यनिधी क्षणांत जमला । आणि काम झाले सुरूं ॥४८॥ यापुढील अवघें वृत्त । येईल पुढल्या अध्यायांत । सत्पुरुषाचा पुरविण्या हेत । देव राहे तत्पर सदा ॥४९॥ विठू पाटील डोंगरगांवचा । लक्ष्मण पाटील वाडेगांवचा । जगु आबा शेगांवचा । हे पुढारी वर्गणीचे ॥१५०॥ श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । ऐका श्रोते सावचित्त । निजकल्याण व्हावया ॥१५१॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति द्वादशोध्यायः समाप्तः ॥
No comments:
Post a Comment